ईडी म्हणजे पान तंबाखूचं दुकान झालंय, माझ्या घरी देखील धाड पडू शकते; प्रणिती शिंदेचा आरोप
ज्या लोकांनी शेतकऱ्यांना मारलंय ते लोक आता खुलेआम फिरताना दिसत आहेत, तर निर्दोष लोक हे जेलमध्ये आहेत असा आरोप आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर केला आहे.
सोलापूर : ईडी (ED) म्हणजे पान तंबाखूच्या दुकानासारखे झालं आहे. भाजप सरकारच्या काळात ईडी, सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थांचा वापर हा राजकारणासाठी केला जात आहे. त्यामुळं भाजपच्या विरोधात बोललात तर तुमच्या घरी केंव्हाही ईडीची धाड पडू शकते. ती माझ्या घरीही पडू शकते अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केलीय. ज्या लोकांनी शेतकऱ्यांना मारलंय ते लोक आज खुशाल बाहेर फिरतायत आणि निर्दोष लोक जेलमध्ये आहेत, भाजपची लोक केवळ आग लावण्याचं काम करत आहेत अशी घणाघाती टीका देखील त्यांनी यावेळी केली. त्या सोलापुरातील एका सभेत बोलत होत्या. (Praniti Shinde says ED has become a Pan tobacco tapari it will raid my house).
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, "भाजपमुळे देशातील सामाजिक वातावरण बिघडलं आहे. देशात सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या भीतीमुळेच सर्वजण घरात बसले आहेत. आज मी यांच्या विरोधात बोलतेय तर माझ्या घरीही ईडीची धाड पडू शकते. ईडी म्हणजे पान-तंबाखूचं दुकान झालंय. कुणाच्याही घरात घुसतात आणि लोकांना उचलून नेतात. ज्या लोकांनी शेतकऱ्यांना मारलं आहे ते लोक आता खुलेआम फिरताना दिसत आहेत. तर निर्दोषांना त्रास दिला जात आहे. समझने वालोंको इशारा काफी है."
देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा डाव भाजप आणि पंतप्रधान मोदींचा असल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. काँग्रेसच्या काळात अशी भीती नव्हती, जे काही मनात असायचं ते केलं जायचं, तशा पद्धतीने वागण्याचं स्वातंत्र्य असायचं असंही त्या म्हणाल्या.
संबंधित बातम्या :