राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी मुख्यमंत्री आज राज्यपालांना सोपवणार!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी सुपूर्द करणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या नावांना राज्यपाल मंजुरी देणार की आडकाठी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
![राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी मुख्यमंत्री आज राज्यपालांना सोपवणार! CM Uddhav Thackeray to submit list of 12 legislative council candidates through governors quota to Bhagat Singh Koshyari राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी मुख्यमंत्री आज राज्यपालांना सोपवणार!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/02133006/Uddhav-Thackeray_Bhagat-Singh-Koshyari.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी आज (2 नोव्हेंबर ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुपूर्द करणार आहे. राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना मंजुरी देणार की आडकाठी करणार यावर सर्वांचं लक्ष आहे. मात्र राज्यपाल कुठल्या निकषांवर आणि घटनात्मक तरतुदींवर बोट ठेवून सरकारची कोंडी करु शकतात यावर लक्ष असेल. यासाठी सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत अंतिम झालेल्या नावांची यादी विधी व न्याय विभागाकडे छाननीसाठी पाठवण्यात आली आहे. जेणेकरुन राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या सर्व निकषात ही नावं बसावीत, अन्यथा पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांचे नाव असणार का याबाबत देखील राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप खडसेंचं नाव निश्चित झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंतिम क्षणी खडसेंचं नाव येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
उर्मिला मातोंडकरांच्या नावावरुन शिवसेनेत मतभेद? दरम्यान उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीवरुन शिवसेनेत दोन मतप्रवाह झाल्याचं समजतं. आयात लोकांना संधी मिळत असल्याने पक्षात प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेत कलाकार, साहित्यिक, समाजसेवकांची मोठी संख्या आहे पण नेहमीप्रमाणे बाहेरुन येणाऱ्याना प्राधान्य देण्याचा पांयडा पडला असल्यामुळे शिवसैनिक नाराज असल्याची कुजबुज सध्या सुरु झाली आहे. काही नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्षातली अस्वस्थता मांडली. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर उर्मिलाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यावर पेच निर्माण झाला आहे.
रेणुका शहाणे यांच्याही नावाची चर्चा? विधानपरिषदेसाठी उर्मिला मातोंडकर आणि शरद पोंक्षे यांच्यानतर आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांचं नावही विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी चर्चेत आहे. रेणुका शहाणे यांना विधानपरिषदेवर पाठवा अशी मागणी काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मेंशन करुन ट्विटरवर त्यांनी ही मागणी केली. रेणुका शहाणे या समाजभान जपणाऱ्या अभिनेत्री आहेत. अनेक मुद्द्यांवर त्या अभ्यासपूर्ण आणि परखड भाष्य करत असतात. त्यामुळे निर्भीड रेणुका शहाणे यांना पाठवून न्याया द्यावा, असं जुन्नरकर यांनी म्हटलं आहे.
भाजपसमोर महाविकास आघाडीच्या वाढत्या पक्षीय बलाबलाचं आव्हान पुन्हा सत्तेत येण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्यांमुळे महाविकास आघाडीच्या वाढत्या पक्षीय बलाबलाचं मोठं आव्हान आहे. सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या भाजपची ताकद विधानपरिषदेत कमी होत असल्याने वरिष्ठांसमोर आमदारांचं मनोबल कायम ठेवण्याची कसरत सुरु आहे. एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ अपक्ष आमदार गीता जैन यांनी भाजपकडे पाठ फिरवल्यामुळे भाजपतील नव्या-जुन्या आमदारांमध्ये चलबिचल सुरु असल्याचं कळतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)