CM Uddhav Thackeray Meets HM Amit Shah : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
CM Uddhav Thackeray Meets HM Amit Shah : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली असून मुख्यमंत्री या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
CM Uddhav Thackeray Meets HM Amit Shah : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवारी) दिल्ली दौऱ्यावर आहेत. वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उपस्थित राहाणार आहे. महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवाई संदर्भात मुख्यमंत्री यांच्या उपस्थित सोमवारी वर्षावर आढावा घेण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात स्वतंत्र बैठक होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नक्षलवादी परिसरात रखडलेल्या विकासकामांचाही कालच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. नक्षलवादी कारवाया या ग्रामीण भागातून शहरी भागात वाढत असल्यानं केंद्रीय गृहमंत्र्यांनी आज दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीनंतर अमित शाह यांच्यासोबत सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांची चर्चा होते का? याकडेही सर्वांचं लक्ष आहे.
दिल्ली दौऱ्यासाठी आज (रविवारी) सकाळीच मुख्यमंत्री विमानानं दिल्लीला जाणार आहेत. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ते बैठकीला हजर राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे अमित शहा यांची वेगळी भेट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या महाराष्ट्रामधील गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या भागांमध्ये नक्षलवादाची समस्या प्राकर्षाने दिसून येत आहे. या भागांमध्ये विकास कामांना गती देण्यास केंद्राचे तसेच राज्याचे प्राधान्य आहे. मात्र आता नक्षलवादाची समस्या मोठ्या शहरांमध्ये निर्माण होऊ शकते, अशी भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या गंभीर मुद्द्यावर केंद्र आणि राज्यांनी एकत्र काम करण्याची गरज असून पुढील वाटचाल कशी असावी? यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्राकडून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावण्यात आलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही दिल्ली दौरा केला होता. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण होते. त्यावेळी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि तौते चक्रीवादळ मदतीसंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा करण्यात आली होती. याव्यतिरिक्त त्यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वतंत्र बैठकही पार पडली होती. त्यावेळी राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं होतं.