(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाणार प्रकल्पात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मावशीच्या मुलाची जमीन : निलेश राणे
नाणार जमीन खरेदीमध्ये आता मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचं नाव घेत निलेश राणे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर नेम साधला आहे. त्यामुळे शिवसेना यावर काय भूमिका घेणार? निलेश राणेंच्या आरोपांना शिवसेना काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.
रत्नागिरी : कोकणात नाणार तेल शुद्धीकरण कारखान्यावरून आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. नाणारमधील बाधित जमिनींमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मावस भाऊ निशांत देशमुख याची 1400 एकर जमीन असून सुगी डेव्हलपर्स या नावानं या कंपनीनं हे व्यवहार केले आहेत.
अॅडव्होकेट कवतकर यांनी जमीन खरेदी व्यवहारासंदर्भातील कागदपत्र तयार केले. 2014 पासून 1400 एकरचे सारे व्यवहार LLP (limited lability partnerships) अर्थात लिमेडेट लायबलिटी पार्टनरशिपनुसार झाल्याचं यावेळी निलेश राणे यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि खासदार यांच्यावर देखील टीका केली. नाणार प्रकल्पामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परप्रांतियांना जवळपास 60 ते 70 टक्के जमिनी विकल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना प्रकल्पाला विरोध असल्याचं दाखवत असली तरी प्रकल्प आणण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारीच प्रयत्न करत असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. तर, प्रोजेक्ट आणू पाहणारी कमिटी सातत्यानं मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात असल्याचं देखील यावेळी निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
लोकांचा उद्रेक झाल्यास आम्ही जबाबदार नसू; नाणार रिफायनरी प्रश्नी आता विरोधकांची आक्रमक भूमिका
'एमआयडीसीमध्ये देखील शिवसैनिकांनी व्यवहार केले' रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामधील बारसू येथे देखील एमआयडीसी येणार असून त्याठिकाणी देखील शिवसैनिकांनी जमिनींचे व्यवहार केले आहेत. यामध्ये बंद सातबाऱ्यांचा व्यवहार केला गेला आहे. त्यामुळे यांना तुरूंगात पाठवले पाहिजे अशी मागणी देखील यावेळी निलेश राणे यांनी केली. शेतकऱ्यांची फसवणूक होत असून यावर मी गप्प बसणार नाही असं राणे यांनी सांगितले आहे.
..अन् नाणारचा मुद्दा पुन्हा आला चर्चेत नाणार प्रकल्पासाठी समर्थकांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यानंतर नाणारबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. यावेळी 8500 हजार एकर जमीनमालकांची संमती असल्याचं समर्थकांनी म्हटलं आहे. दरम्यान, नाणार प्रकरणी उद्रेक झाल्यास आम्ही जबाबदार नसू असं विधान नाणार येथील विरोधकांचे नेते अशोक वालम यांनी केले आहे. शिवाय, या ठिकाणी झालेल्या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशीची मागणी देखील वालम यांनी केली आहे.
शिवसेना काय प्रतिक्रिया देणार? नाणार जमीन खरेदीमध्ये आता मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचं नाव घेत निलेश राणे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर नेम साधला आहे. त्यामुळे शिवसेना यावर काय भूमिका घेणार? निलेश राणेंच्या आरोपांना शिवसेना काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे. पण, सध्या या प्रकल्पावरून जोरदार राजकारण पुन्हा एकदा सुरू झालं आहे.
#NanarProject नाणारवासिय आणि उद्धव ठाकरेंची भेट कोण रोखतंय? नाणार प्रकल्पासंदर्भात कोण आडकाठी करतंय?