Salman Khan House Firing : गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची सलमान खानशी फोनवरून चर्चा; सुरक्षेत केली वाढ
Salman Khan House Firing : सलमान सोबत मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरून चर्चा केली आहे. यावेळी मुख्यमंत्री यांच्याकडून सुरक्षे संदर्भात दिलासा देण्यात आला आहे.
Salman Khan House Firing : सीने अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील (Mumbai) घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना आज पहाटे समोर आली आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दखल घेतली आहे. तसेच सलमान सोबत मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरून चर्चा देखील केली आहे. यावेळी मुख्यमंत्री यांच्याकडून सुरक्षे संदर्भात दिलासा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीने अभिनेता सलमान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. आज पहाटे सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीने अभिनेता सलमान खान यांच्याशी फोनवरून चर्चा करून त्यांना सुरक्षे संदर्भात दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही सूचना केली असल्याची देखील माहिती मिळत आहे.
पोलिसांची प्रतिक्रिया...
सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर आता पोलिसांची देखील प्रतिक्रिया आली आहे. परिमंडळ 9 चे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी या घटनेबाबत माहिती देतांना म्हटले आहे की, "पहाटे पाचची घटना आहे. घराबाहेर रस्त्यावर फायरिंग झालेली आहे. तपासासाठी आम्ही टीम तयार केलेले आहेत. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे, आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अद्याप कुणावर संशय वगैरे काही नाही. तसेच, जबाबदारी वगैरे असं कोणी स्वीकारली असा अद्याप काही नाही, असं राज तिलक रौशन म्हणाले.
फडणवीसांची प्रतिक्रिया...
सलमान खानच्या घरावरील गोळीबाराच्या घटनेवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांच्या तपासातून खरी माहिती समोर येईल. त्यामुळे पोलिसांच्या तपास होईपर्यंत यावर काही सांगता येणार, नसल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
संजय राऊतांची टीका...
सलमान खानच्या घरावरील गोळीबाराच्या घटनेवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुती सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "मुंबईसह महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली असून, गृहमंत्री राजकारणात व्यस्त आहेत. तसेच सत्तधारी पक्षातील चिल्लर कार्यकर्त्यांना पोलीस पोलीस संरक्षण देण्यात येत आहे, असे राऊत म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :