CM,DCM Press Conference: आमची ताकद वाढली, याचा आम्ही कोणताही दुरुपयोग करणार नाही - देवेंद्र फडणवीस
CM,DCM Press Conference: पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ठेवण्यात आलेल्या चाहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
CM,DCM Press Conference : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सोमवारपासून (17 जुलै) सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवार (16 जुलै) रोजी चहापानाचा कार्यक्रम पार पडला, विरोधकांनी त्यावर बहिष्कार टाकला. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM) आणि उपमुख्यमंत्र्यांनी (DCM) पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस म्हणाले की, 'आम्ही त्यांना (विरोधकांना) निमंत्रण दिलं होतं, पण ते आले नाहीत.' मी पहिल्यांदा विरोधी पक्ष बघत आहे की ज्यांना विषय माहित नाही.'
आम्ही लोकहिताचे निर्णय घेऊ - देवेंद्र फडणवीस
ज्या गोष्टी अधिवेशनात मांडल्या जातील त्या सर्व गोष्टींवर आमची चर्चा करण्याची तयारी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'आमची ताकद वाढली असून याचा आम्ही कोणताही दुरुपयोग करणार नाही.' तसेच आता आम्ही लोकहिताचे निर्णय घेणार असल्याचा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. या सरकारच्या एका वर्षाच्या कामगिरीत राज्य एफडीआयमध्ये अव्वल स्थानी आल्याची माहिती फडणवीसांनी यावेळी दिली. तसेच गुंतवणुकीत गुजरात, कर्नाटकपेक्षा महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याचं त्यांनी म्हटलं. सरकारवर उद्योग पळवण्याचा जो आरोप करण्यात येतो तो देखील देवेंद्र फडणवसांनी धुडकावून लावला आहे.
राज्याची शिक्षण व्यवस्था हि सातव्या क्रमांकावर आल्याने विरोधी पक्षांनी यावरुन सरकारावर ताशेरे ओढले. मात्र राज्याची शिक्षण व्यवस्था ढासळली नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'शरद पवारांनी राज्याचा शिक्षण दर्जा घसरला असल्याचं पत्र लिहिलं. पण राज्याचा शिक्षण दर्जा घसरला नाही. मूल्यांकनामध्ये पहिल्या पाच श्रेणीत कुठलीच राज्य नाहीत. त्यामध्ये महाराष्ट्रही दुसऱ्या क्रमांकावर आहे.'
विरोधकांना चोख उत्तर देऊ - अजित पवार
चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार का टाकला याचं पत्र विरोधी पक्षाकडून देण्यात आलं होतं. यावर बोलतांना अजित पवारांनी म्हटलं की, 'त्या पत्रामध्ये काही ठोस कारणं दिसली नाहीत. तसेच त्यावर कुणाकुणाच्या सह्या होत्या हे देखील आम्ही पाहिलं आहे.' अधिवेशनावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'आम्ही बहुमताच्या जीवावर कामकाज रेटून नेणार नाही. तसेच विरोधकांना देखील चोख आणि मान राखून उत्तर देऊ असा विश्वास देखील अजित पवारांनी व्यक्त केला आहे. '
सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री शिंदे
आम्ही फक्त आमच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली नाही तर संपूर्ण राज्याची जबाबदारी घेतली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच आरोग्य यंत्रेणाला सक्षम करण्यासाठी 4 हजार 365 कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे. तसेच राज्यात शेतकऱ्यांवर आलेल्या संकटामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं आहोत असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही अधिवेशनात करु असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षावर निशाण साधत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की,विरोधी पक्ष सध्या गोंधळलेल्या आणि आत्मविश्वास गमावलेल्या परिस्थितीमध्ये आहे. अजित पवार सरकारामध्ये आल्याने विरोधी पक्षाचे धाबे दणाणले आहे असा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच आता विरोधी पक्ष कुठे आहे हे शोधावं लागेल असा घणाघात देखील त्यांनी विरोधी पक्षांवर केला आहे.