CM Thackeray - PM Modi Meeting: : मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळ उद्या पंतप्रधान मोदींना भेटणार
मराठा आरक्षणाबरोबरच (Maratha Reservation) केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तौक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तौक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. उद्या संध्याकाळी वाजता भेटणार असून या क्रायक्रमाची रुपरेषा पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
मराठा आणि ओबीसी आरक्षणसंदर्भातील बैठकीला शिष्ठमंडळासोबत मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार आहे. मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्यपालांच्या माध्यामतून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करत राज्यपालांना पत्र दिलं होते. तसेच भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होते.
काल शिवराज्यभिषेकदिनी संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली. येत्या 16 जून पासून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर पुढचे पाऊल म्हणजे महाविकासआघाडीने पुन्हा एकदा हा चेंडू केंद्राच्या कोर्टात टाकला आहे. एकीकडे भाजपकडून रणनिती आखली जाते तर दुसरीकडे महाविकास आघाडी भाजपच्या नेत्यांना भेटून आरक्षणाचा तिढा सोडवण्याची विनंती करणार आहे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "मी 2007 पासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. माझा लढा हा 70 टक्के गरीब मराठ्यांसाठी आहे. मराठा समाज हा सामाजिक मागास नाही, म्हणून आरक्षण देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. त्याचं सर्वांनाच दु:ख झालं. आता कोण चुकले कोण बरोबर याच्यावरुन मागचे सरकार आणि आताचे सरकार यांच्यात वाद सुरु आहे. या वादाशी आम्हाला काही घेणं-देणं नाही, मराठा समाजाला आरक्षण कसं देणार ते सांगा."