Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अण्णा हजारेंना व्हिडीओ कॉल, तुमचे आशिर्वाद राहू द्या, मार्गदर्शन करा
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधला.
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. यावेळी त्यांनी अण्णा हजारेंना आशिर्वाद राहू द्या.. तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करा... अशी विनंती केली. एकनाथ शिंदे आणि अण्णा हजारे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालया. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.
एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना घेऊन गोव्यातून आज मुंबईकडे रवाना झाले. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी गोव्यातील हॉटेलमधून अण्णा हजारे यांच्यासोबत व्हिडीओ कॉलवरुन संवाद साधला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी अण्णा हजारेंना आपले आशिर्वाद राहू द्या.. तसेच हक्काने आदेश देत जा.. असे म्हणत प्रणाम केल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.
पाहा व्हिडीओ -
चर्चा काय झाली?
मुख्यमंत्री - नमस्कार अण्णा, एकनाथ शिंदे बोलतोय.
अण्णा - तुमचे अभिनंदन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - खूप खूप आभारी आहे... तुमचा आशीर्वाद राहू द्यात, शुभेच्छा असू द्या. मार्गदर्शन करत राहा.. जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा आदेश द्या... राज्याच्या हितासाठी आणि जनतेला अपेक्षित असं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू
गोव्यातून आमदार मुंबईकडे रवाना -
उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपद निवड आणि सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत येत आहेत. गोव्यातून हे आमदार निघाले असून सव्वा तासामध्ये मुंबईत येणार असून त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी तदडा बंदोबस्त ठेवला आहे. तब्बल 11 दिवसांनंतर शिंदे गटाचे आमदार हे मुंबईत दाखल होत आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज डोमेस्टिक एयरपोर्ट च्या गेट क्रमांक 9 मधून ते बाहेर पडतील. त्या ठिकाणी आता ढोल ताशे आणण्यात आले असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच या मार्गावर शेकडोच्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आमदार ज्या मार्गाने जाणार त्या मार्गावर विशेष कॉरिडॉर पोलिसांनी केला आहे. तीन विशेष बसच्या माध्यमातून हे आमदार एयरपोर्टमधून बाहेर येतील.
उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवड
विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे आगामी काळात अध्यक्ष महोदय असं कुणाला संबोधलं जाणार याचा निर्णय उद्या होणार आहे. दरम्यान या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे.