(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon News: मोठी बातमी! खान्देशसाठी जळगावला स्वतंत्र विभागीय आयुक्तालय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Jalgaon: खान्देशातील विभागीय आयुक्त कार्यालयाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.
Jalgoan News: खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी जळगाव येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात येईल. तसेच केळी विकास महामंडळासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद करण्यात येईल. त्याचबरोबर बोदवड उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगावात केल्या.
जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदान येथे 'शासन आपल्या दारी' या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, 'शासन आपल्या दारी' अभियानात जळगाव जिल्ह्यात 3 लाख 3 हजारपेक्षा अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला आहे. यापैकी 35 हजार लाभार्थी उपस्थित आहेत. सततच्या पावसामुळे झालेले नुकसान नैसर्गिक आपत्ती म्हणून धरले. शेतकऱ्यांना 1500 कोटी रूपयांची नुकसान भरपाई दिली. नैसर्गिक आपत्तीसाठी आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना 12 हजार कोटींची मदत केली आहे. एक रूपयात पीक विमाचा निर्णय घेतला. नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजार रूपये प्रोत्साहन रक्कम दिली. महिला सक्षमीकरणासाठी लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. शासकीय योजनांचा लाभ घेऊन सरपंचांनी आपले गाव स्वच्छ व समृद्ध करण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, परदेशी गुंतवणूकीत राज्याने आघाडी घेतली आहे. एक लाख 18 हजार कोटी रूपयांची परदेशी गुंतवणूक राज्यात मागील वर्षभरात झाली आहे. राज्यातील सर्व साडेबारा कोटी नागरिकांना आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार केला जाणार आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांना गती दिली जाईल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील वर्षभरात जिल्ह्यात 20 हजार हेक्टर शेती क्षेत्रावर ठिंबक सिंचनाचा लाभ देण्यात आला. याचा 21 हजार शेतकऱ्यांना लाभ झाला. 50 हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला. 1 हजार ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. रस्ते कामांकरिता जिल्ह्याला अडीच हजार कोटींची मदत शासनाने केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा चाळ जळगाव जिल्ह्यात उभारण्यात आल्या. जलजीवन मिशनच्या 1354 योजना जिल्ह्यात सुरू आहेत. फळबाग योजना व नैसर्गिक आपत्तीत जळगाव जिल्ह्याला भरघोस मदत करण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून हार्वेस्टिंग मशीनचे सारथ्य
जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या समारोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः व्यासपीठावर खाली येऊन शेतकऱ्यांना पॉवर टिलर वाटप करण्यासाठी गेले. त्याठिकाणी त्यांना महाडीबीटी योजनेत एका लाभार्थ्यांला मिळालेले हार्वेस्टिंग मशीन दिसले. मुख्यमंत्री स्वतः या मशीनवर चढले आणि त्यांनी मशीनचे सारथ्य केले. त्यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील, मंगेश चव्हाण हे ही हार्वेस्टिंग मशीनवर सोबत उपस्थित होते.