बुलंद हौसले दुश्मन के छाती पर तिरंगा गाड के आते थे, LOC वर शिवरायांचा पुतळा; मुख्यमंत्र्यांचं धडाकेबाज भाषण
छत्रपतींचा हा पुतळा प्रेरणादायी आहे. ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मिळालं, महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले आहे.
जम्मू काश्मीर : जम्मू कश्मीरमधील (Jammu & Kashmir) कुपवाड्यात (Kupwara) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण झाले. लेझीम आणि झांज वादनानं नंदनवन दुमदुमलं गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष पर्वतरांगांच्या पलिकडे असलेल्या पाकिस्तानात पोहचला पाहिजे. छ्त्रपतींचा हा पुतळा प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यामुळे प्रेरणा दिली आहे. शत्रूच्या छातीत देशाचा तिरंगा गाडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सैनिकांना प्रेरित करेल त्यांना उर्जा देईल. त्यामुळे शत्रूची आपल्याकडे बघायची हिंमत होणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.
जम्मू काश्मीरमधील कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. शिवरायांच्या पुतळ्याचं आज अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपतींचा हा पुतळा प्रेरणादायी आहे. ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मिळाले. विश्वास बसत नाही भारत पाक सीमेवर छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे.
महाराष्ट्र आणि काश्मीरचे नाते जुने
लाल चौकात सामान्य माणसांना जाणे कठीण होते. तिथे पंतप्रधानांनी तिरंगा फडकवला आहे. महाराष्ट्र आणि काश्मीरचे नाते जुने होते. महाराष्ट्रातील अनेक संस्था काश्मीरमध्ये काम करत आहे. त्यांचे योगदान अतिशय मोठे आहे, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज या नावातच ऊर्जा आहे. त्यांच्या पुतळा हा प्रेरणादायी असून वाईट नजरेने देशाकडे पाहणाऱ्यांसाठी इशारा आहे. महाराष्ट्राच्या सरकारची कधीही मदत लागली तर आम्ही जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत आम्ही तुमच्या सदैव सोबत राहू. 41 आर आर ही बटालियन नेहमीच तयार असते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची वैशिष्ट्य
कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन यंदाच्या पाडव्याच्या दिवशी करण्यात आले. त्यासाठी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणण्यात आली होती. हा पुतळा साडे दहा फूट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि 7 बाय 3 या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे. पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलिकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेनं असावं अशापद्धतीनं पुतळा बसविण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे 1800 ट्रक माती टाकून भराव करण्यात आला. शिवाय याभागातील हवामान, भूस्खलन या बाबी पाहता पक्कं बांधकाम करून पाया तयार करण्यात आला आहे.