(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhaji Nagar: नागरिक म्हणाले, पाणी गढूळ; आयुक्तांनी स्वतः पिलं अन् म्हणाले हे तर शुद्ध
Chhatrapati Sambhaji Nagar : बिस्लेरीची बाटली नाकारून आयुक्तांनी त्यांच्या गाडीतील बाटलीत देखील प्रक्रिया केलेले पाणी भरून घेतले.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील पाण्याची वाढती मागणी आणि टंचाई पाहता मागील वर्षापासून हडको सिडको भागात जायकवाडीऐवजी हर्सूल तलावातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र असे असताना मागील काही महिन्यांपासून हर्सूल तलावातून पाणीपुरवठा केला जाणारे पाणी गढूळ येत आहे. तर दोनच दिवसांत या पाण्यात जंत होतात, अशी तक्रार नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे आणि आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सोमवारी हर्सूल जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन पाहणी केली. तसेच नागरिकांना पाणीपुरवठा होत असलेले पाणी ते स्वतः प्यायले. तसेच हे पाणी शुद्ध आहे, असे सांगत त्यांनी बाटलीभर पाणी सोबत घेतले.
शहरातील नागरिकांना जयकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र भार कमी करण्यासाठी मागील वर्षे उन्हाळ्यात हर्सूल तलावातून देखील पाणीपुरवठा करण्यात येऊ लागला. यात सिडको-हडको परिसरात हर्सूल येतील जलशुद्धीकरण केंद्रातून सध्या पाणीपुरवठा सुरु आहे. ज्यात दररोज 8 एमएलडी पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया होते. मात्र पाणी गढूळ येत असून त्याला वास येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी प्रशासकांकडे केल्या होत्या. त्याची दखल घेत प्रशासकांनी हर्सल जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. तेव्हा त्यांच्यासाठी बिस्लेरीची बाटली आणण्यात आली होती. मात्र प्रशासकांनी प्रक्रिया केलेले पाणी पिण्यासाठी मागवले. ते पिल्यानंतर या पाण्याने तहान भागली जात असून, पिण्यासाठी योग्य आहे. त्याची चवही चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच बिस्लेरीची बाटली नाकारून त्यांनी त्यांच्या गाडीतील बाटलीत देखील प्रक्रिया केलेले पाणी भरून घेतले.
उद्यानातील विहिरीतील पाणी देखील पिले
दरम्यान याचवेळी प्रशासक जी. श्रीकांत यांनी हर्सल तलावाची स्मृती उद्यान, जांभूळबनची पाहणी करून पाळूला तारेचे संरक्षक कुंपण घालण्याचे आदेश दिले. उद्यानातील विहिरीतील पाणी देखील ते स्वतः प्यायले. हे पाणी अत्यंत चांगले असून या ठिकाणी चक्री लावून नागरिकांना हे पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना केली. हर्सल तलावाकडे येणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक दोन वर्षांत वाढली आहे. त्यामुळे त्याचे लवकरच रुंदीकरण करावे, अशी मागणी देखील नागरिकांनी यावेळी केली.
पिण्याचा पाण्याचा प्रश्न कधी मिटणार?
छत्रपती संभाजीनगर शहराला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. यासाठी 700 मिमी आणि 1400 मिमीच्या दोन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र या दोन्ही जलवाहिन्यांचे आयुष्य आता संपले आहे. त्यातच आता वाढती लोकसंख्यामुळे पाण्याची कमतरता भासत आहे. या सर्व परिस्थितीत अनेक भागात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. त्यामुळे मागील काही वर्षात नवीन पाणीपुरवठा योजनांच्या घोषणा झाल्या. पण प्रत्यक्षात एकही योजना मार्गी लागली नाही. त्यामुळे शहरवासीयांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कधी मिटणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
मान्सून आला रे..! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी