एक्स्प्लोर
आधी ठरावावरुन राडा, नंतर फराळावरुन गोंधळ; गोकुळच्या सभेत गदारोळाची परंपरा कायम
गोकुळची सकाळी अकरा वाजता सुरु झालेली सभा अहवाल वाचन करुन सर्व ठरावांना मंजूरी देत अवघ्या अर्ध्या तासात गोंधळातच गुंडाळण्यात आली. विरोधकांना बोलण्यास संधी न मिळाल्याने त्यांनी जोरदार घोषणा दिल्या तर सत्ताधारी गटानेही मंजूर मंजूरच्या घोषणा दिल्या.
कोल्हापूर : गोकुळची सभा म्हणजे वादविवाद, तणाव, राडा, पोलिस बंदोबस्त हे ठरलेलंच. यंदाही ती परंपरा कायम राहिली. गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत आधी ठरावावरुन आणि नंतर फराळ न मिळाल्यावरुन गोंधळ झाला. गोकुळच्या आजच्या सभेत विरोधकांनी गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा ठराव मांडण्याची मागणी केली होती. मात्र असा ठराव सभेत करता येत नसल्याचं अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी सांगितल्यानंतर गोंधळ सुरु झाला. यानंतर सतेज पाटील आणि महाडिक गट आमनेसामने आला. "आमचं ठरलंय आता गोकुळ उरलंय" अशी घोषणाबाजी सतेज पाटील गटाने केली.
सकाळी अकरा वाजता सुरु झालेली सभा अहवाल वाचन करुन सर्व ठरावांना मंजूरी देत अवघ्या अर्ध्या तासात गोंधळातच गुंडाळण्यात आली. विरोधकांना बोलण्यास संधी न मिळाल्याने त्यांनी जोरदार घोषणा दिल्या तर सत्ताधारी गटानेही मंजूर मंजूरच्या घोषणा दिल्या. यामुळे सभेतील वातावरण तणाव निर्माण झाला होता. गोकुळ मल्टिस्टेटचा विषय न्यायालयात असल्याने आम्ही सर्वसाधारण सभेत रद्दचा ठराव घेतला नसल्याचं अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी सांगितलं. तर काहीही करा पण मल्टिस्टेट रद्द करण्याचा शब्द पाळा, असं आव्हान आमदार सतेज पाटील यांनी दिलं आहे.
गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा; सत्ताधाऱ्यांवर खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ
यानंतर अल्पोपहारावरुन गोंधळ
गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत आधी ठरवावरुन आणि नंतर फराळ न मिळल्यावरुन गोंधळ झाला. खेड्यापाड्यातून आलेल्या सभासदांना अल्पोपहार न मिळाल्याने गोंधळ झाला. या सभेसाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लज, गगनबावडासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सभासद आले होते. परंतु अल्पोपहार न मिळाल्याने उपाशीपोटी जाण्याची वेळ त्यांच्यावर आली.
बंटी पाटलांना डोनेशनच्या पैशांची मस्ती : धनंजय महाडिक
सतेज पाटील आणि कंपनी सकारात्मक राजकारण करत नाही. ते कायमच नकारात्मक राजकारण करतात. त्यांनी विनाकारण लोकांच्या मनात विष पेरण्याचं काम केलं. गोकुळचं खाजगीकरण करण्याचा घाट सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. दोन दिवसांपूर्वीच मल्टिस्टेट करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. परंतु ठराव मंजूर करण्याआधी एक महिन्यापूर्वी विषयपत्रिकेत घ्यावा लागतो. परंतु बदनाम करायचं, भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करायचे हे सतेज पाटलांचं काम आहे. बंटी पाटलांना डोनेशनच्या पैशांची मस्ती खूप आहे. जिल्ह्यातील सगळ्या संस्था माझ्या ताब्यात पाहिजे हा त्यांचा हट्ट असतो. गोकुळच्या निवडणुकीच्या वेळी कळेल की गोकुळ हातात राहिल की नाही. कोणाला निवडून आणायचं पेक्षा कोणाला बाद करायचं एवढंच तुमचं धोरण असतं. 'गली गली में शोर है, बंटी पाटील चोर है' हे सगळ्यांना माहित आहे.
धनंजय महाडिकांचा अभ्यास कमी : सतेज पाटील
धनंजय महाडिकांचा अभ्यास कमी आहे. त्यांच्याच लोकांनी दंगा केला, आमच्या लोकांनी नाही. सत्ताधाऱ्यांनी खोटे पास देऊन लोक आणले आणि त्यांना पुढे बसवलं. आमच्या लोकांनी गोंधळ घालण्याचं कारणच नाही, कारण आमच्या मनाप्रमाणे घडतंय. ज्यांच्या मनाप्रमाणे घडत नाही, तेच गोंधळ घालत होते. पुढचा व्हिडीओ पाहा, हिंमत असेल तर पुढे बसलेल्या लोकांची नावं जाहीर करावं. आमचे लोक शांतपणे मागे उभे होते. त्यांना बसायलाही जागा नव्हती.
मागच्या वर्षी राडा
मागच्या वर्षी गोकुळच्या सभेत महाडिक आणि सतेज पाटलांच्या गटात तुफान राडा झाला होता. खुर्च्यांची फेकाफेक झाली होती. काहीजणांनी दूधाच्या पिशव्याही पळवून नेल्या. यावर्षी मात्र ही परिस्थिती टाळण्यासाठी सत्ताधारी महाडिक गटाने चक्क खुर्च्या बांधून ठेवल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement