Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे महानालायक; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेची बोचरी टीका
सोलापूर येथील सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केलीय. त्यांच्या या टीकेला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत त्यांचा उल्लेख महानालायक म्हणून केलाय.
Chandrashekhar Bawankule On Uddhhav Thackeray : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या प्रचारार्थ काल, 29 एप्रिलला सोलापूरात उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्यावर घणाघाती टीका करत चौफेर फटकेबाजी केलीय. उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर आता भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक्सवरून टीका करताना पुन्हा उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) उल्लेख महानालायक म्हणून केलाय.
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे महानालायक - चंद्रशेखर बावनकुळे
महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल बोलताना आज पुन्हा तोल गेलाय. उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद देवेंद्रजींसोबत आहेत. पण उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा काही थांबायचं नाव घेत नाही. अडीच वर्षे घरात बसून काढली, बोलण्यासाठी एक विकासकामही केलं नाही. मग लोकांसमोर गेल्यावर अशी मुक्ताफळे उधळण्याची वेळ येते. अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
उद्धव ठाकरे हे आता नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत. त्यांची ही वायफळ बडबड त्यांच्या पक्षातील उमेदवारांना आणि त्यांच्या नेत्यांना सुद्धा नकोशी झाली असल्याचेही बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आता एक लक्षात ठेवावं की, तुम्ही मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल कितीही वायफळ बडबड करा. मात्र 4 जून रोजी जनता तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही. असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रामदास स्वामींनी लिहिलेल्या ओळींचा आधार घेत टीका
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामदास स्वामींनी लिहिलेल्या काही ओळींचा आधार घेत उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये |संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||| असे रामदास स्वामींनी लिहिलेल्या मुर्खांची लक्षणं या ओळींचा वापर करत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतलाय. आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे गटाकडून कशा पद्धतीने उत्तर देणात येतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या