एक्स्प्लोर
चंद्रपुरात तरुणाच्या केसासह कातडी कापणाऱ्या अमानवी पोलिसाचं निलंबन
तक्रार दिल्यावर ठाणेदाराने कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली नाही. तीन शिपाई घेऊन त्यांनी सरळ तरुणाला घरात घुसून अमानुष मारहाण केली. इतक्यावरच न थांबता ठाणेदाराने खिशातून धारदार चाकूने तरुणाच्या डोक्यावरील केसांसह चक्क कातडीच काढून जमिनीवर फेकली.
चंद्रपूर : चंद्रपुरात तरुणाच्या डोक्यावरचे केस आणि कातडी कापणाऱ्या अमानवी पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. तपासासाठी घरी गेलेले पिट्टीगुडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल आळंदे यांनी तरुणाला मारहाण करुन त्याच्या डोक्यावरचे केस आणि कातडी कापली होती.
चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या जिवती तालुक्यातील आंबेझरी या गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. आंबेझरी येथील देविदास कंदलवार हा तरुण दारुच्या नशेत गावकऱ्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी होत्या. अनिल आळंदे या भागातील पिट्टीगुडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार आहेत. तपासासाठी ते देविदासच्या घरी गेले, मात्र त्याचं म्हणणं ऐकून न घेता थेट न्याय केल्याने संताप व्यक्त होत आहे.
पिट्टीगुडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर ठाणेदाराने कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली नाही. तीन शिपाई घेऊन त्यांनी सरळ देविदासला घरात घुसून अमानुष मारहाण सुरु केली. इतक्यावरच समाधान न मानता ठाणेदाराने खिशातून धारदार चाकूने देविदासचे डोक्यावरील केसांसह चक्क कातडीच काढून जमिनीवर फेकली.
देविदास रक्तबंबाळ झाल्याचं पाहून पत्नीने सोडवण्याचा प्रयत्न केला. उपस्थित गावकऱ्यांनाही पोलिसांनी हाकलून लावलं. रक्तस्त्राव वाढत असल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांनी रात्री उशिरा देविदासला जखमी अवस्थेत गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं.
दरम्यान गडचांदूर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या पीडित युवकाचं प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न स्थानिकांच्या सतर्कतेने उघड पडला. या प्रकरणी तक्रार झाल्यावर गडचांदूरच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी तपास हाती घेतला. यात प्रथमदर्शनी अधिकारी दोषी आढळल्याने विविध कलमान्वये ठाणेदार आळंदे यांच्यासह तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अधिक चौकशीअंती पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी ठाणेदार अनिल आळंदे यांना निलंबित केलं आहे.
पिट्टीगुडा येथील ठाणेदाराचे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असून उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे सामान्य जनतेला दिलेली वागणूक या घटनेने चांगलीच चर्चेत आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement