दुर्देवी! चंद्रपूरमध्ये जनरेटरच्या धुरामध्ये गुदमरुन एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
चंद्रपूर शहरातील दुर्गापूर भागात एक दुर्देवी घटना समोर आली आहे. डिझेल जनरेटरमधून निघालेल्या धुरामध्ये गुदमरुन एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
चंद्रपूर : घरात लावलेल्या जनरेटर संचाच्या धुराने गुदमरून 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर भागात घडली आहे. मृतांमध्ये एका नवविवाहित जोडप्याचाही समावेश आहे. रात्री झोपताना घरात लावलेल्या जनरेटर संचाच्या धुराने गुदमरून या एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
चंद्रपूर शहराच्या अगदी जवळ असलेल्या दुर्गापूर भागात आज सकाळी एकच हाहाकार माजला. नेहमी प्रमाणे सकाळी लवकर उठणारे लष्करे कुटुंबातील लोक दिसत का नाही म्हणून आजूबाजूच्या लोकांना शंका आली. घराचं दार उघडलं आणि त्यांना धक्काच बसला. या घटनेत रमेश लष्करे (44) यांच्यासह त्यांच्या मुलगा अजय लष्करे (20), सून माधुरी लष्करे (18) आणि इतर 3 मुलं पूजा लष्करे (14), लखन लष्करे (9) आणि कृष्णा लष्करे (8) यांचा मृत्यू झाला. तर रमेश लष्करे यांची पत्नी दासू लष्करे (40) यांची प्रकृती चिंताजनक आहे.
सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे रमेश लष्करे यांच्या मुलाचं 28 जूनला लग्न झालं होतं आणि त्यांची सून परवाच माहेरून परत आली होती. या दुर्घटनेत अजय आणि माधुरी या नवदाम्पत्याचाही मृत्यू झालाय. रात्री वीज गेल्यावर घरात या कुटूंबाने डिझेल जनरेटर संच लावला होता. या जनरेटरच्या धुरामुळे त्यांचे श्वास गुदमरले असावे आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
डिझेल जनरेटरमधून निघणाऱ्या धुराने या सहा जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला जात आहे. स्थानिक लोकांनी याबाबत महावितरणच्या कामकाजाबाबत मोठा रोष व्यक्त केलाय. लोकांच्या मते रात्री लाईट गेल्यावर तातडीने तर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असता तर ही दुर्घटना झाली नसती.
ज्या लष्करे कुटुंबावर हा दुर्दैवी घाला पडला त्या कुटुंबात नवीन लग्न झाले म्हणून आनंदी वातावरण होते. मात्र जनरेटरमधून निघणारा धूर या सर्वांना कायमचा शांत करून गेला. या दुर्दैवी घटनेचे आणखी काही अँगल आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.