स्त्रियांच्या जीवनातील आनंद वाढवणारा समूह 'भजनानंद'; चंद्रपूरमधील अनोखा उपक्रम
कोरोनामुळे आलेल्या निराशेच्या काळात चंद्रपूरमधील प्रा. नीता पुल्लीवार यांनी 'भजनानंद' या ग्रुपच्या माध्यमातून एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे.

चंद्रपूर : कोरोना महामारीने देशातीलच नव्हे तर जगातील समस्त लोकांना काळजी करण्यास भरीस पाडलं. या महामारीमुळे कित्येकांनी त्यांची जवळची माणसं गमावली, कित्येकांना इतर त्रासाला सामोरं जावं लागलं. परंतु या परिस्थितीतही चंद्रपूरच्या डबल एम.ए. बी.एड. शिक्षित प्रा. नीता पुल्लीवार यांनी स्वतःमध्ये सकारात्मक उर्जा ठेवून इतरांना धीर देण्याचा एक सकारात्मक उपक्रम हाती घेतला. 'भजनानंद' या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी एक अनोखा उपक्रम राबण्याचा प्रयत्न केला आहे.
चंद्रपुरातील 71 वर्षीय नीता पुल्लीवार यांचा रामायण, महाभारत, इत्यादींवर गाढा अभ्यास आहे. भजन, किर्तन, भागवत कथा, व्याख्यान, संतवाङ्मय, इत्यादी छंद जोपासणाऱ्या ह.भ.प. नीता पुल्लीवार यांनी गेल्या वर्षी 02 जूलै रोजी व्हॉट्सअॅपवर "भजनानंद" नावाचा गृप तयार केला. त्यात त्यांनी भजनं, किर्तनं, भागवत कथा, व्याख्यानं इत्यादी उपक्रम ऑनलाईन रूपात घेण्यास सुरुवात केली.
गेल्या एक वर्षाच्या कालावधीत "भजनानंद" या व्हाॅट्सअॅप गृपमध्ये देशातील विविध क्षेत्रातील त्याचसोबत परदेशातील जवळजवळ 3600 ते 3800 स्त्रीया सामील झाल्या. सुरुवातीला पुल्लीवार यांनी त्यांच्या पुण्यातील मैत्रीणींच्या साथीने "भजनानंद" हा व्हॉट्सअॅप गृप तयार केला. महिन्याभरातच त्या गृपमध्ये विविध भागांतील 100 ते 150 जणी सामील झाल्या. हळूहळू समूहातील स्त्रीयांची संख्या वाढत गेल्यामुळे त्यांनी समूहाचे उपसमूह तयार करण्यास सुरुवात केली.
शिवभजनानंद, बालभजनानंद, शक्तिभजनानंद असे आज एकूण 19 उपसमूह आहेत. प्रत्येक समूह हा देशातील विविध क्षेत्रातील असल्यामुळे विविध भाषांमध्ये तयार केल्या गेला. एका उपसमूहात 180 ते 200 महिला आहेत. या उपक्रमामुळे पुल्लीवार यांनी दोन हजार कुटुंबांना जोडले आहे. मग ते कुटुंब देशातील किंवा जगातील विविध भागातील का असेना. आज लोकांना मानसिक आधार, मानसिक धीराची आवश्यकता आहे, जो पुल्लीवार यांनी या दोन हजार कुटुंबांना सदर उपक्रमाद्वारे दिला आहे. या समूह-उपसमूहांमध्ये वय वर्ष तीन पासून वय वर्ष 83 पर्यंतच्या महिलांचा समावेश आहे. दररोज संध्याकाळी साडे पाच ते आठ या वेळेत सदर समूहांवर भजन सेवेचे कार्यक्रम घेतले जातात. दररोजच्या भजनाचे वेगवेगळे विषय असतात जसे सोमवार असल्यास शंकराचे भजनं, मंगळवार असल्यास देवीची भजनं, शनिवार असल्यास मारुतीची भजनं इत्यादी.
काही महिला त्यांचा आवाज चांगला नसल्यामुळे भजनं गाण्यास संकोच करत असल्या कारणाने त्यांच्या करिता लेखनाचा उपक्रम राबविला जातो. दररोजच्या लेखांचे विषय हे वेगळे असतात, उदा. उन्हाळा असल्याने आंब्याच्या पदार्थांची रेसिपी, गव्हाच्या पदार्थांची रेसिपी, विविध पापडांची रेसिपी, इत्यादी किंवा दिनविशेष प्रमाणे जसे झाशीच्या राणीची माहिती, राजमाता जिजाऊंची माहिती अभिनयाच्या स्वरूपात, ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात किंवा लेखांच्या स्वरूपात लिहायला दिले जातात. लहान मुलींकरिता संस्कार वर्गाचेही आयोजन करण्यात येते. सोबतच व्हॉट्सअॅप ग्रृपमध्ये असलेल्या महिलांशी पुल्लीवार या दरमहा झूम कॉलवर संवाद साधतात. सोबतच त्याही वेळेस विविध प्रकारचे वेशभूषा कार्यक्रमसुद्धा आयोजित केले जातात. सदर समूहांचे संयोजन हे ह.भ.प. नीता पुल्लीवार या स्वतः करतात, तसेच सहसंयोजन हे सौ. चैताली खटी या करतात. नियोजनाचं दायित्व हे राखी जामकर या यशस्वीरित्या पार पाडतात. अशाप्रकारे पुल्लीवार यांनी स्वतःमध्ये सकारात्मक उर्जा ठेवून कोरोनाच्या या वाईट परिस्थितीमध्ये इतरांना धीर देण्याची जबाबदारी स्वीकारत सामाजिक बांधिलकी जपण्याचा पूरेपूर प्रयत्न केला आणि यात त्या यशस्वीरित्या पार पडल्या.
महत्वाच्या बातम्या :
























