(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrapur Crime case : 2 कोटींचा गंडा घालणाऱ्या आरोपीला अखेर 3 वर्षांनी अटक
लोकांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून तब्बल 2 कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पालघर येथून अटक आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Chandrapur Crime case : आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून अनेक लोकांना 2 कोटींचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फरार झालेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने पालघर येथून अटक केली आहे. पंकज फुलझेले असं या आरोपीचं नाव आहे. पंकज फुलझेले याने चंद्रपूर शहरात 2015 साली एक कंपनी स्थापन करून लोकांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवले होते. काही वर्ष परतावा दिल्यावर हा आरोपी 2019 साली फरार झाला होता.
दरम्यान, फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी पंकज फुलझेले याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र, तेव्हापासून फरार असलेल्या या आरोपीला अखेर 3 वर्षांनी जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. 2015 ला आरोपी पंकज फुलझेले याने चंद्रपूरच्या जटपुरा परिसरात आपली पत्नी आणि भाऊ धिरज यांच्यासोबत मिळून ओरियंट अँड ओजस बायोटेक नावाची कंपनी काढली. काही लोकांना एजंट म्हणून नोकरीला ठेवले आणि त्याच्या माध्यमातून लोकांना आकर्षक व्याजदाराचे आमिष दाखवून कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला पंकज फुलझेले याने लोकांना आकर्षक व्याजदर देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढत गेला आणि लोकांनी जवळपास 2 कोटी रुपयांची कंपनीत गुंतवणूक केली. या कंपनीत जवळपास 45 लोकांनी गुंतवणूक केली आणि या गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये सेवानिवृत्त लोकांची संख्या सर्वाधिक होती. काही दिवसांनी त्याने लोकांना व्याजाचे पैसे देणे बंद केले. लोकांनी पैसे परत मागितल्यावर त्याने व्याज आणि मुद्दल परत दिले नाही. त्यामुळे लोकांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
दरम्यान, 15 एप्रिल 2019 ला त्याच्यावर भादंवी 420 आणि 39 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करताच पंकज फुलझेले हा आपल्या कुटुंबीयासह फरार झाला. त्यानंतर आरोपी वारंवार आपलं ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत होता. मात्र, या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी पुन्हा नव्याने तपास करत आरोपीचे नवीन मोबाईल नंबर शोधून काढले. या मोबाईल नंबरच्या आधारे आरोपीचा माग काढत सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांनी त्याला पालघरच्या लक्ष्मी लॉज मधून अटक केली. सध्या या आरोपीला रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून रामनगर पोलीस पुढील तपास करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: