(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' योजनेत राज्यानं देशात मारली बाजी, जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती
केंद्र सरकार (Central Govt) सर्वसामान्य नागरिकांसाठी महिलांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आर्थिक पाठबळ तसेच प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं.
Mahila Samman Bachat yojana : केंद्र सरकार (Central Govt) सर्वसामान्य नागरिकांसाठी, महिलांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या (Yojana) माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आर्थिक पाठबळ तसेच प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं. अशीच केंद्र सरकारची एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत योजना (Mahila Samman Bachat yojana). सरकारनं खास महिलांसाठी ही योजना सुरु केली आहे. आत्तापर्यंत देशभरातील 43 लाख नवीन ठेवीदार या अल्पबचत योजनेत सामील झाले आहेत. या योजनेत महाराष्ट्रानं अव्वल क्रमांक मिळवला आहे.
सरकार महिलांसाठी वेळोवेळी अनेक योजना आणत असते. 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत योजनेची विशेष योजना सुरू केली होती. ही योजना खास महिलांच्या गरजेनुसार तयार करण्यात आली आहे. या योजनेबाबत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील 43 लाख नवीन ठेवीदार या अल्पबचत योजनेत सामील झाल्या आहेत. या योजनेत बचत प्रमाणपत्र दिले जाते, ज्यामध्ये चक्रवाढ व्याज दिले जाते.
महाराष्ट्रानं मारली बाजी
महिला सन्मान बचत योजनेत महाराष्ट्रानं बाजी मारली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक महिला या योजनेत सामील झाल्या आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत 7,46,223 महिलांनी खाती उघडली आहेत. तर तामिळनाडूमध्ये 5,47,675 खाती उघडण्यात आली आहेत आणि ओडिशामध्ये 4,16,989 खाती उघडण्यात आली आहेत. तर कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये 2,93,007 आणि 2,69,532 खाती उघडण्यात आली आहेत. तसेच पश्चिम बंगालमध्ये 2,54,777 खाती उघडण्यात आली आहेत.
महिला सन्मान बचत योजनेचा योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो?
महिला सन्मान बचत योजनेचा लाभ कोणतीही महिला घेऊ शकते. जर अल्पवयीन व्यक्तीचे खाते उघडले असेल तर ते पालकाच्या नावाने उघडले जाते आणि 18 वर्षे वय पूर्ण केल्यानंतर हस्तांतरित केले जाते. या योजनेत जास्तीत जास्त 2 लाख रुपये एकरकमी जमा करता येतील. आंशिक पैसे काढण्याचा पर्याय देखील आहे आणि ही योजना 7.5 टक्के निश्चित व्याज देते. त्यामुळं या योजनेला महिलांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसत आहे.
ग्रामीण महिलाही या योजनेत सामील
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारी 2023 च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. ही योजना सुरू करण्यामागील सरकारचा हेतू महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्याचा आहे. महिला सन्मान योजनेचा लाभ ग्रामीण महिलाही घेत आहेत. तसेच शहरांतील महिलाही या योजनेत गुंतवणूक करत आहेत.