Wardha Lok Sabha 2024: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल; आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
Wardha Lok Sabha 2024: माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
Wardha Lok Sabha 2024: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेच उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आसल्याची माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख हे शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) स्टार प्रचारक आहेत. 26 एप्रिलला राज्यात विदर्भ आणि मराठवड्याच्या आठ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची रणधुमाळी पार पाडली. यात वर्धा लोकसभा मतदारसंघाचा (Wardha Lok Sabha 2024) देखील समावेश असून अनिल देशमुख हे येथील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे (Amar Kale) यांच्या प्रचारकरीत वर्ध्यात तळ ठोकून होते.
मात्र, स्टार प्रचारक किंवा बाहेर जिल्ह्यातील नेत्यांना मतदारसंघातून 48 तास आधी जिल्ह्यातून बाहेर जाण्याचे संकेत असतानाही अनिल देशमुख यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या हिंगणघाट येथे भेट दिलीय. ही बाब आदर्श आचारसंहितेच उल्लंघन करणारी असल्याचा ठपका ठेवत अनिल देशमुखांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा
वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकस आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाने अमर काळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विदर्भातील पवार गटाचे दिग्गज नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आपल्या पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून प्रचारकार्य पार पाडत होते. मात्र, बाहेर जिल्ह्यातील नेत्यांनी मतदानाच्या 48 तास आधी जिल्हा सोडण्याचे आदेश आहे. पण तरीही अनिल देशमुख काल दुपारी वर्धा मतदारसंघात हजर असल्याचे बघायला मिळाले. दुपारी साडे चार ते पावणे पाच दरम्यान देशमुख यांनी हिंगणघाटच्या नंदोरी चौकात भेट दिली. तसेच हिंगणघाट येथे संध्याकाळच्या सुमारास त्यांनी हिंगणघाट येथे येऊन कार्यकर्त्यांच्याही भेटी घेतल्या. परिणामी, ही बाब नियमांचे उल्लंघन करणारी असून या प्रकरणी हिंगणघाटचे विस्तार अधिकारी सुभाष टाकळे यांनी तक्रार करत हा प्रकार उजेडात आणला. या तक्रारीनंतर हिंगणघाट पोलिसात अनिल देशमुख यांच्यावर वर गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली आहे.
वर्ध्यात मतदानाच्या टक्केवारीत केवळ दीड टक्क्याने वाढ
वर्षभरात प्रशासनाकडून गाजावाजा करीत मतदार जनजागरण कार्यक्रम राबविण्यात आले. परिणामी मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा होती. तर मतदानाचा टक्का वाढला, पण तो मागील 2019 च्या तुलनेत केवळ दीड टक्केच वाढल्याचे चित्र आहे. याशिवाय 2014 च्या लोकसभेच्या टक्केवारीकडे नजर टाकली तर ती 64 टक्के इतकी होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 61.18 टक्के मतदान झाले होते. तर 2024 म्हणजे काल झालेल्या मतदानात 62.66 टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी केवळ दीड टक्क्याने मतदानात वाढ झाली आहे. यात पुरुषांचे प्रमाण 67.33 टक्के इतके आहे. तर महिलांचे प्रमाण 57.79 इतके आहे. यंदा महिला मतदारांचे प्रमाण कमी झाले आहे. कालच्या मुहूर्तावर लग्नसमारंभाचा सपाटा असल्याने मतांच्या टक्केवारीत तुलनेत वाढ झाली नाही. तर महिलांची देखील टक्केवारी लग्नामुळे कमी झाली असल्याचे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या