मालेगावात कोरोनासंबंधी नियम मोडत सभा घेणं माजी आमदाराच्या अंगलट, असिफ शेख यांच्यासह दोन आयोजकांवर गुन्हा दाखल
सभेला परवानगी नाकारली असताना सुद्धा आसिफ शेख यांनी हटवादी भूमिका घेत जाहीर सभा घेतली. यावेळी सभेत अनेकांच्या तोंडाला मास्क लावलेला नसल्याचं पाहायला मिळालं.
मालेगाव : कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्देशानुसार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातलेली आहे. मात्र सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असतानाही मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी रौनकाबाद येथे काल रात्री जाहीर सभेचे आयोजन केलं. या सभेला त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कोरोनाचे नियम आणि सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याच पाहायला मिळालं. नियम मोडून जाहीर सभा घेणं माजी आमदारांच्या अंगलट आहे. पोलिसांनी माजी आमदार असिफ शेख यांच्यासह दोन आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.
विषेश म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली असताना सुद्धा आसिफ शेख यांनी हटवादी भूमिका घेत जाहीर सभा घेतली. यावेळी सभेत अनेकांच्या तोंडाला मास्क लावलेला नसल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी सरकार कसोशिने प्रयत्न करत असताना एका माजी आमदाराने सर्व नियम पायदळी तुडवले. दरम्यान परवानगी दिलेली नसताना जाहीर सभा घेतल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्वॅब न देताच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; बुलडाण्यातील मोताळा कोविड सेंटरमधील अजब प्रकार
2014 मध्ये आसिफ शेख मालेगाव मध्यमधून कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडूण आले होते. मात्र 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर सुद्धा ते पक्षाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय होते. मात्र पक्षाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी मागील महिन्यात कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकला. त्यानंतर शहरातील अनेक प्रतिष्ठितांसोबत बैठका घेत कुठल्या पक्षात प्रवेश करायचा याची चाचपणी त्यांनी सुरु केली होती.
Corona : कोरोना वाढतोय! महाराष्ट्रात पाच महिन्यानंतर एका दिवसात 10 हजार कोरोनाबाधित
त्यानंतर काल आसिफ शेख यांनी याच विषयासाठी जाहीर सभा घेतली. मात्र कोरोनाच्या संक्रमणामुळे पोलिसांनी परवानगी नाकारलेली असताना सुद्धा सभा घेतली. या सभेला मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे पोलिसांनी आज त्यांच्यासह दोन आयोजनकांवर गर्दी जमवल्याचा ठपका ठेवत कारवाई केली आहे. पवारवाडी पोलीस स्टेशनमध्ये या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सभेत त्यांनी शहर हिताच्या 15 अटी शर्ती मान्य झाल्या तरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं.