एक्स्प्लोर
अनामत रक्कम म्हणून चिल्लर, पैसे मोजताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ

नागपूर : 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या चित्रपटातील नायक मकरंद अनासपुरे उमेदवारी अर्ज भरताना चिल्लर घेऊन येतो आणि अधिकाऱ्यांचे नाकीनऊ येतात. तसाच काहीसा प्रकार आज नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पाहायला मिळाला. नागपूर विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार विलास बल्लमवार यांनी अनामत रक्कम म्हणून चक्क एक रुपयांची नाणी आणली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मोजणी सुरु केली. या प्रकारामुळे अधिकारी आणि कर्मचारी चकीत झाले. विलास बल्लमवार हे नागपूर विभाग शाळा कृती समितीचे उमेदवार आहेत. बल्लमवार उमेदवारी अर्ज भरताना अनामत रक्कम चक्क चिल्लरच्या स्वरुपात आणली. दहा हजार रुपयांपैकी तब्बल साडे आठ हजार रुपये हे एक रुपयांची नाणी होती. तर दीड हजार रुपये नोटांच्या स्वरुपात होत्या. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विलास बल्लमवार यांची कृती नियमबाह्य नव्हती, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जमिनीवर बसून चिल्लरची मोजदाद सुरु केली. मूळचे गडचिरोलीचे असलेले अपक्ष उमेदवार विलास बल्लमवार यांच्या या चिल्लर पुराणाचं कारणही ऐकण्यासारखं आहे. "शिक्षकांची अवस्था विदारक आहे. अनेक शिक्षक वर्षानुवर्षे कायम विनाअनुदानित शाळांमध्ये अत्यल्प मोबदल्यावर काम करत आहे. त्यांनी मला एक एक रुपये याप्रमाणे साडे आठ हजार रुपये दिले आणि मी निवडणुकीत त्यांची लढाई लढण्यासाठी उभा राहिलोय," अशी प्रतिक्रिया विलास बल्लमवार यांनी दिली. उमेदवाराचं कारण काहीही असलं तरी चिल्लरची मोजदाद करता-करता कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले. तासाभराच्या कसरतीनंतर मोजणी पूर्ण झाली. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं नागपुरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात गोंधळ पाहायला मिळाला.
आणखी वाचा























