(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, त्या नाराज नाहीत': देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसं न झाल्यानं पुन्हा एकदा मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर पुढे येऊ लागला आहे
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार अखेर पार पडला. या विस्तारात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रीतम मुंडे यांच्या जागी भागवत कराड यांना संधी मिळाली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागली आणि पुन्हा एकदा मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर पुढे येऊ लागला आहे. डॉ.प्रीतम मुंडे या दुसऱ्यांदा लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्याऐवजी भाजपनं वर्षभरापूर्वी राज्यसभेवर घेतलेल्या वंजारी समाजातील डॉ.भागवत कराड यांची वर्णी लावली. यामुळं मुंडे भगिनी नाराज असल्याचं बोललं जाऊ लागलं.
यावर भाजपकडून प्रतिक्रिया आली असून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे भगिनी नाराज नसल्याचं म्हटलं आहे. नाशिकमध्ये याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारावरून मुंडे भगिनी नाराज,हे कोण म्हणतं? निर्णय पक्ष वरीष्ठ स्तरावरून घेतो. मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका,त्या नाराज नाहीत, असं ते म्हणाले. तसंच नारायण राणे हे त्यांच्या कार्यक्षमतेमुळे मंत्रिमंडळात असल्याचंही ते म्हणाले.
अनेकदा सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाची मदत लागते, त्यासाठी आम्ही तयार: देवेंद्र फडणवीस
राज्यकारभार करताना अनेकदा सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाची मदत लागते, त्यासाठी आम्ही तयार आहोत असं देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये परिवहन बससेवा लोकार्पण कार्यक्रमात म्हणाले. यावेळी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. मनपाने बस चालू केल्यानं माझ्या दारापाशी, माझ्या मतदारसंघात बस अली पाहिजे असा हट्ट नगरसेवक धरतात. कारण त्यामुळे मतं मिळतात. मीही तेच केलं, पण मनपाने असा निर्णय घेतल्याने हा त्रास वाढतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, कोरोना काळात सर्वच परिवहन वाहतूक व्यवस्था तोट्यात गेल्या. तोट्यात जाणारी बस मनपाला परवडणार का? डिझेल खूप महाग झाले आहे. त्यामुळे डिझेल बस बंद करा आणि त्या ठिकाणी इथेनॉल आणा असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांगतात. आपली शहरं ही वाढती आहेत, त्यामुळे शहरांच्या समस्यांही वाढत असतात. त्यामुळे आपण शांत बसून चालत नाही असा सल्लाही देवेंद्र फडणवीसांनी नाशिक मनपा प्रशासनाला दिला.