ABP C-Voter Survey : शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण कुणाला मिळायला हवं? सर्वेक्षणात लोकांनी यांना दिली पसंती
ABP News C-Voter Survey : एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना आणि धनुष्यबाणावर दावा केला. त्यानंतर हे प्रकरण निवडणुक आयोग (Election Commission) आणि सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहचलेय.
ABP News C-Voter Survey : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत 30 जून रोजी भाजपसोबत सरकार स्थापन केले होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारणाला वेगळं वळण मिळालं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील 40 आमदारांसोबत बंडखोरी करत सर्वांनाच धक्का दिला होता. या सर्व प्रकारानंतर एकनाथ शिंदे आणि इतर त्यांच्या सहकारी आमदारांनी आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केलाय. त्यामुळे शिवसेनेतील दोन गट समोर आले.
एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना आणि धनुष्यबाणावर दावा केला. त्यानंतर हे प्रकरण निवडणुक आयोग (Election Commission) आणि सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहचलेय. शिंदे गटानं आपणच खरी शिवसेना आहे, तसेच धनुष्यबाण आपल्यालाच मिळावा असा दावा केला आहे. हे प्रकरण सध्या निवडणुक आयोगाकडे गेले आहे. यावर लवकरच सुनावणी होणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या दाव्याला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. 27 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापिठानं उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळून लावली. तसेच शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? हे प्रकरण निवडणुक आयोग करेल, असं सांगितलं.
महाराष्ट्रातील या घटनेवर एबीपी न्यूजने सी व्होटरच्या मदतीनं सर्व्हे केला. यामध्ये शिवसेनेचं नाव आणि निशाण शिंदे गटाला मिळायला हवं का? असा सर्व्हे करत लोकांचं मत जाणून घेतलं. सी व्होटरच्या साप्ताहिक सर्व्हेमध्ये लोकांनी मोठ्या संख्येनं भाग घेतला. यामध्ये तब्बल 51 टक्के लोकांनी शिवसेनेचं नाव आणि धन्यष्यबाण शिंदे गटाला मिळायला हवं असं मत नोंदवलं आहे. तर 49 टक्के लोकांनी शिवसेनेचं नाव आणि धन्यष्यबाण शिंदे गटाला मिळू नये, असं मत नोंदवलं आहे.
एबीपी न्यूज सी व्होटरच्या या सर्व्हेमध्ये चार हजार 427 जणांनी सहभाग नोंदवला होता. सर्व्हेचे परिणाम लोकांनी दिलेल्या आधारावर आहे. त्यासाठी एबीपी न्यूज जबाबदार नाही.
तीन मुद्द्यावर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने
सत्ताधारी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे तीन प्रमुख मुद्द्यावर लढत आहेत. यामध्ये खरी शिवसेना कुणाची? हा पहिला मुद्दा आहे. तर पक्षाचं चिन्ह कुणाकडे जाईल? हा दुसरा मुद्दा आहे. तर तिसरा मुद्दा शिंदे गटाला घटनात्मक मान्यता आहे की नाही?
बहुमताच्या आधारावर निर्णय होणार
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाला द्यायचं याबाबत निर्णय देणार आहे. पक्ष कुणाचा हा निर्णय बहुमताच्या आधारे म्हणजे रुल ऑफ मेजॉरिटीच्या माध्यमातून घेण्यात येतो असा इतिहास आहे. त्यामुळे आता शिवसेनेतील पदाधिकारी कोणत्या बाजूला आहेत यावर हा निर्णय होण्याची शक्यता आहे.