Buldhana News: बुलढाण्यात काँग्रेसला मोठा धक्का! जिल्ह्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे
Maharashtra Politics: बुलढाणा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार देण्यात यावा या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील सर्वच्या सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत आपले लक्ष वेधले आहे.
Buldhana News: बुलढाणा जिल्हा हा पारंपारिकरित्या काँग्रेस पक्षाचा (Congress) मतदारसंघ राहिलेला आहे. मात्र गेल्या पंधरा वर्षापासून हा मतदारसंघ आघाडीच्या माध्यमातून कधी राष्ट्रवादीला(NCP) तर कधी दुसऱ्या पक्षाला सुटत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जनतेची कामे करताना अडचण जात आहे. त्यामुळे यंदा हा मतदारसंघ (Lok Sabha Election 2024) काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यात यावा आणि काँग्रेसचाच उमेदवार देण्यात यावा या मागणीसाठी आज बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील सर्वच्या सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत आपले लक्ष वेधले आहे.
शेकडो पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे
बुलढाणा लोकसभेची जागा महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळालेली असल्याचे बोलले जात आहे. तर या जागेवर प्रा. नरेंद्र खेडेकर हे संभावित उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब न झाल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. अशातच आता हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याच्या शक्यतेवर नाराजी व्यक्त करत बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज आपले राजीनामे देत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
बुलढाणा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. परिणामी, राहुल बोंद्रे यांनी या सर्व घडामोडी बाबत तात्काळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन करून या बाबत कळविले आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या दिलेले राजीनामे हे काँग्रेसला मोठा धक्का मानले जात असून या टोकाच्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
बुलढाण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला ?
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अद्यापही महायुती किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झालेली नाही. महायुतीकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव तर महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना संभाव्य उमेदवार म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र अद्यापही दोघांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र महाविकास आघाडीत झालेल्या चर्चेनुसार काही जागेची अदलाबदल होण्याची शक्यता असल्याने बुलढाण्याची जागा काँग्रेसला सुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस अॅड. जयश्री शेळके यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात बुलढाणा लोकसभेची जागा महाविकास आघाडी मध्ये नेमकी कोणाच्या वाट्याला येते हे पाहणे आता अधिक उत्सुकतेचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या