Buldhana : ... नाहीतर फटके देऊन सरळ करेन; आमदार श्वेता महालेंचा रुद्रावतार
भाजपा आमदार श्वेता महालेंनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकाला ठोकून काढण्याची भाषा केली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होताना दिसतोय.
बुलढाणा: अतिवृष्टीमुळे मिळालेली मदत व पिकविम्याची आलेली रक्कम शेतकऱ्यांना न देता परस्पर पीककर्ज खात्यात वळती करून त्या खात्याला होल्ड लावण्यात येत होती. त्या विरोधात चिखलीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकाला जाब विचारताना भाजप आमदार श्वेता महालेंचा पारा चढला. आमदारांचा फोन उचलायचा नाही असा तुला कोण आदेश दिला, तो आदेश दाखव नाहीतर फटके देऊन सरळ करेन असा दमही त्यांनी बँक व्यवस्थापकाला दिला.
बुलढाण्यातील चिखली येथील बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांना आलेली मदत त्यांना न देता परस्पर पीक कर्ज खात्यात वळती करायचं काम सुरु होतं. त्या संबंधी आमदार श्वेता महालेंनी बँक व्यवस्थापकाला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण राजकीय मंडळींचा फोन घ्यायचा नाही असा आदेश असल्याचं बँक व्यवस्थापकाने बँकेत आलेल्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं. त्यामुळेच आमदार श्वेता महालेंचा पारा चढला.
आमदार श्वेता महालेंनी तडक बँक गाठली आणि त्या व्यवस्थापकाला जाब विचारला. आमदारांचे फोन घ्यायचा नाही असा कोणता आदेश आला आहे. तू आदेश दाखव नाहीतर फटके देऊन सरळ करेन असा दमही त्यांनी दिला. आमदार श्वेता महाले त्या व्यवस्थापकाला म्हणाल्या की, आडनाव काय तुझं? कुठलाय तू? इथं रहायचं असेल ना तर नीट रहायचं बाबा. इथं तुला पगार मिळतो तो शेतकऱ्यांची कामं करण्यासाठी. विनाकारण खोटं बोलून शेतकऱ्यांची दिशाभूल करायची नाही. नाहीतर फटके देऊन सरळ करावं लागेल.
आमदार श्वेता महालेंनी त्या बँक व्यवस्थापकाला माफी मागायला सांगितली. आमदारांचा तो रुद्रावतार पाहून शेवटी त्या बँक व्यवस्थापकाने त्यांची माफी मागितली. यापुढे शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावायचं नाही, त्यांची अडवणूक करायची नाही असा सज्जड दमही त्यांनी बँक व्यवस्थापकाला दिला.
आमदार श्वेता महालेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.