लॉकडाऊनमध्ये दुबईतून 'एअरलिफ्ट' घडवणारा मराठमोळा वायुदूत; हजारो नागरिकांना पाठवले मायदेशी
लॉकडाऊनच्या काळात आखाती देशांमध्ये अडकून पडलेल्या पुण्या-मुंबईतील हजारो नागरिकांसाठी दुबईतील राहुल तुळपुळे हे युवा उद्योजक रियल इंडियन हीरो ठरले आहेत.
सांगली : 2016 साली प्रदर्शित झालेला आणि 1990 साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारीत एयरलिफ्ट हा चित्रपट आपण पाहिलाय. या चित्रपटात कुवैत -इराक युद्धादरम्यान तब्बल 1 लाख 70 हजार भारतीयांचे जीव वाचवून त्याना त्या देशातून सुरक्षितपणे बाहेर काढून भारतात आणणाऱ्या एका कुवैती बिझनेसमनची भूमिका अक्षय कुमारने साकारली होती. अक्षय कुमार सारखी भूमिका साकारण्याचे काम कोरोनाच्या या लॉकडाऊन काळात दुबईतील एका उद्योजकाने केली आहे. या मराठमोळ्या उद्योजकाचे नाव आहे राहुल तुळपुळे.
कोरोना संसर्ग परिस्थितीत आखाती देशांमध्ये अडकून पडलेल्या पुण्या-मुंबईतील हजारो नागरिकांसाठी दुबईतील राहुल तुळपुळे हे युवा उद्योजक रियल इंडियन हीरो ठरले आहेत. आखाती देशांमधील भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेत दक्षिण भारतातील नागरिक मोठ्या संख्येने परतले. मात्र, पुण्या-मुंबईतील दहा हजारांहून अधिक नागरिक तेथे अडकले होते.या नागरिकांची अडचण लक्षात आल्यानंतर त्यांच्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यास तुळपुळे यांनी अथक परिश्रम घेतले.दुबईत अडकलेल्या धनश्री पाटील यांनी त्यासंदर्भात सोशल मीडियावर केलेली पोस्ट तुळपुळे यांनी पाहिली. गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमच्या माध्यमातून तुळपुळे यांनी दुबईमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. तसेच भारतामधील केंद्र सरकारशी संपर्क साधून पुण्या-मुंबईतील नागरिकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था केली. आखाती देशातून पुण्या-मुंबईत येणारे हे पहिलेवहिले खाजगी चार्टर्ड विमान ठरत आहे. नोकरी गेल्यामुळे किंवा व्यवसायात नुकसान झाल्यामुळे तिकिटाचे पैसेही भरू शकत नसलेल्यांना फोरमच्या वतीने आर्थिक मदत देण्यात तुळपुळे यांनीच पुढाकार घेतला. तसेच पुण्या-मुंबईतील नागरिकांच्या भारतामध्ये आल्यानंतर विलगीकरणाची सर्व व्यवस्था नियमानुसार पूर्ण केली जाईल याची खातरजमाही तुळपुळे यांनी केली. तुळपुळे यांच्या पुढाकाराने एक विमान मुंबईला दाखल झाले असून, एक पुण्याला येत आहे. येत्या काळात आणखी चार विमाने पुण्या-मुंबईला आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.
राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सोशल मीडियावर राहुल तुळपुळे यांच्या कामाचे कौतुक करणारी पोस्ट टाकलींआहे. त्या पोस्ट मध्ये डॉ.विश्वजित कदम यांनी राहुल तुळपुळे हे माझे व्यक्तिगत, जवळचे मित्र असून ते व्यवसाय करीत असतानाच कायम सामाजिक बांधिलकी जपत आल्याचे म्हटले आहे. तसेच भारतीय नागरिकांच्या मदतीचे कर्तव्य ते मोठ्या निष्ठेने बजावत आहेत. म्हणूनच, मला त्यांच्या कामगिरीचा अभिमान आहे असेही डॉ. कदम आपल्या पोस्टमध्ये म्हणतात.