Breaking News LIVE : पुढील तीन-चार तास मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
Breaking News LIVE Updates, 27 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Bharat Bandh: कृषी कायद्यांच्या विरोधात आज 'भारत बंद'; अनेक पक्ष, संघटनांचाही पाठिंबा
गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmer Protest) पुढचा टप्पा आता पाहायला मिळत आहे. केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या (Agriculture Bill) विरोधात संयुक्त किसान मोर्चानं (Samyukta Kisan Morcha) आज, 27 सप्टेंबरला 'भारत बंद' (bharat bandh) ची घोषणा केली आहे. या बंदला राजकीय पक्ष, कामगार संघटना, शेतकरी संघटनांसह बँकिंग संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) नं एका संयुक्त पत्रकात म्हटलं आहे की, कृषी कायदे हटवणे आणि शेतमालाला किमान हमीभाव कायदाच्या मागणीसाठी सुरु असलेला ऐतिहासिक शेतकरी संप 10व्या महिन्यात पोहोचला आहे. यामुळं आता भारत बंदचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर या बंदला पाठिंबा द्यावा, असं या पत्रकात म्हटलं आहे.
Mumbai Vaccination : मुंबईत आज फक्त महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र; थेट केंद्रावर मिळणार लस
मुंबई महापालिकेनं गेल्या आठवड्यात महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र राबवलं होतं. या विशेष सत्राला महिलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर आजही मुंबई महापालिकेकडून महिलांसाठी विशेष लसीकरण सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबई महापालिकेच्या वतीनं आज, सोमवार (27 सप्टेंबर) सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या वेळेत मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवलं जाणार आहे. यात महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येऊन कोविड लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येणार आहे. या विशेष सत्राच्या पार्श्वभूमीवर आजसाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.
कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगानं आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र आज सोमवार दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत राबवलं जाणार आहे.
पुढील तीन-चार तास मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
पुढील तीन-चार तास मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून इशारा देण्यात आला. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, सांगली, सातारा, नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस आहे. हिंगोली, औरंगाबाद, जालना, जळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पुढील तीन - चार तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर आणि ठाण्यात पुढील ३-४ तास काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे
आरोग्य विभागाच्या परीक्षेचा मुहूर्त अखेर ठरला
आरोग्य विभागाच्या परीक्षेचा मुहूर्त अखेर ठरला असून वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबर तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर ही परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आलीय. यावेळी परीक्षार्थींना 9 दिवस अगोदरच प्रवेश पत्र मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
भवानीपूर पोटनिवडणूक रद्द करण्याची भाजप मागणी
भाजपने भवानीपूर पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उमेदवार आहेत. आज पुन्हा हिंसाचार झाल्याने पश्चिम बंगाल भाजपने ही मागणी केली आहे
नांदेड येथील रेणुका माता मंदिर व दत्त शिखर मंदिराला भाविकांना ये- जा करण्यासाठी रोपवे
रेणुकामातेचे देवस्थान असलेल्या माहूरगडावर 'रोप वे' उभारण्यासंदर्भात राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या 'वॅपकॉस लिमिटेड' मध्ये करार झाला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आणि 'वॅपकॉस'चे प्रतिनिधी दीपांक अग्रवाल यांनी औरंगाबाद येथे या करारावर स्वाक्षरी केली. माहूरगड नांदेड जिल्ह्यात असून, हे काम लवकर मार्गी लागावे, यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण या प्रकल्पाचा पाठपुरावा करीत होते.
'वॅपकॉस लिमिटेड' ही कंपनी केंद्र सरकारचा अंगिकृत उपक्रम असून, ती 'रोप वे' उभारणीतील तज्ज्ञ व अनुभवी कंपनी आहे. माहूरगड येथील रेणुकादेवी मंदीर, श्री दत्त शिखर मंदीर, अनुसुया माता मंदिरासाठी 'रोप वे' उभारणे तसेच रेणुकादेवी मंदिरासाठी 'फुट ओव्हर ब्रीज' व 'लिफ्ट' उभारण्याच्या कामाला केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत सुमारे ५१ कोटी रूपयांची मंजुरी मिळाली आहे.
या कामांचा आरखडा तयार करणे, कंत्राट काढणे, कंत्राटदाराच्या कामावर देखरेख ठेवणे ही सर्व जबाबदारी 'वॅपकॉस लिमिटेड'वर राहणार आहे.
याबाबतच्या करारावर स्वाक्षरी झाल्याने देवीच्या साडेतीन शक्तीपिठांमध्ये समावेश असलेल्या रेणुकामातेच्या मंदिरात 'रोप वे'ने जाऊन दर्शन घेण्याचे भाविकांचे स्वप्न लवकरात लवकर पूर्णत्वास येण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर विशेषतः वयोवृद्ध नागरिकांचा त्रास कमी होणार असून, माहूरगडाला भेट देणाऱ्या भाविकांमध्ये मोठी वाढ होऊन या तीर्थक्षेत्राच्या विकासाला अधिक गती मिळणे अपेक्षित आहे.
Kolhapur : घटस्थापनेला अंबाबाई मंदिर खुलं होणार, मात्र भक्तांना देवीची ओटी भरता येणार नाही
राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी 7 ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील.