Breaking News LIVE : मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 66 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
Breaking News LIVE Updates, 30 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ABP News-C voter Survey: पंतप्रधान पदासाठी सर्वात योग्य व्यक्ती कोण? लोकांच्या मनात कोण?
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एबीपी न्यूज-सी-व्होटर्सनने महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरुन देशाच्या मनात काय आहे हे जाणून घेतलं. यासाठी सी-व्होटरने एक सर्वेक्षण केलं आहे. यात जनतेला अनेक प्रश्न विचारले गेले, त्यातील एक प्रश्नही विचारला गेला की पंतप्रधानपदासाठी सर्वात योग्य व्यक्ती कोण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासह या प्रश्नासाठी बर्याच मोठ्या नेत्यांची नावे जनतेसमोर ठेवली गेली.
तुमच्या मते पंतप्रधान पदासाठी सर्वात योग्य व्यक्ती कोण?
- नरेंद्र मोदी- 44.14 टक्के
- राहुल गांधी - 12.36 टक्के
- सोनिया गांधी - 2.91 टक्के
- मनमोहन सिंह- 6.55 टक्के
- योगी आदित्यनाथ - 1.22 टक्के
- ममता बॅनर्जी - 0.34 टक्के
- अरविंद केजरीवाल - 3.85 टक्के
- इतर- 13. 76 टक्के
- सांगता येत नाही - 14.87 टक्के
अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकीकडे टीका होताना दिसत आहे. दुसरीकडे पंतप्रधान म्हणून आजही नरेंद्र मोदी यांनाच लोकांची पसंती आहे.
सलाम! पुलवामा हल्ल्यातील शहीद मेजर धौंडियाल यांची वीरपत्नी भारतीय सैन्यदलाच्या सेवेत रुजू
देशसेवेत रुजू होण्याचं अनेकांचंच स्वप्न असतं. पण, मुळात हे स्वप्न बाळगणं आणि प्रत्यक्षात देशसेवेत रुजू होऊन या देशासाठी प्राणही त्यागण्याची तयारी दाखवणं यासाठी खऱ्या अर्थानं वाघाचं काळीज लागतं. अशीच जिद्द आणि समर्पकता दाखवली होती भारतीय सैन्यातील मेजर विभूती शंकर धौंडियाल यांनी. देशाच्या सेवेत असताना त्यांना पुलवामा येथे दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलं. फेब्रुवारी 2019 ला मेजर धौंडियाल यांनी या जगाचा निरोप घेतला. पण, त्यांचं अस्तित्वं आणि त्यांची देशाप्रती असणारी ओढ ते मागेच ठेवून गेले.
मेजर यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला, पत्नीला पुरता धक्काच बसला होता. पण, अखेर नियतीही या कुटुंबापुढे झुकली आणि मेजर धौंडियाल याच्या पत्नीनं सारं धाडस एकवटत जीवनातील नव्या पर्वाची सुरुवात केली. मेजर विभूती धौंडियाल यांच्या पत्नी निकीता धौंडियाल यांनी नुकतंच भारतीय सैन्यातील आपली सेवा सुरु केली असून चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी येथे शनिवारी त्यांना लेफ्टनंट पद बहाल करण्यात आलं.
Rain in Jalgaon : जळगावात दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस; तोक्ते चक्रीवादळाप्रमाणे मदतीसाठी प्रयत्न करणार, पालकमंत्री गुलाबराव पाटलांची माहिती
जळगाव : जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावातील घरांचंही या पावसात नुकसान झालं असून वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा केळी पिकाला बसला आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी केली असून तोक्ते चक्रीवादळामुळे कोकणाला ज्या पद्धतीने मदत मिळाली तशी मदत जळगाव जिल्ह्यासाठी मिळण्याकरता प्रयत्न करणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील तापी नदीकाठच्या गावांमध्ये वादळी पावसाने केळी पिकांबरोबरच इतर पिकांचे, घरांचे तसेच विद्युत पोल आणि तारांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
राज्यात 74 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद, आज 18600 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद
राज्यात 74 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद, आज 18600 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद, तर 22532 रुग्ण कोरोनामुक्त, तर 24 तासात 402 रुग्णांचा मृत्यू
मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 66 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 66 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. तर 1327 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने आता कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6 लाख 61 हजार 226 झाली आहे. रिकव्हरी रेट 94 टक्के झाला आहे. सध्या 27 हजार 322 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईतील डबलींग रेट 414 दिवसांवर गेला आहे. तर ग्रोथ रेट 0.16 टक्के झालाय.
केरळमध्ये मान्सून 1 जून ऐवजी 3 जूनला दाखल होण्याची शक्यता
केरळमध्ये मान्सून 1 जून ऐवजी 3 जूनला दाखल होण्याची शक्यता. नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवाह 1 जूनपासून जोर धरण्याची शक्यता. पुढील 5 दिवसात केरळात काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार. महाराष्ट्रातही पुढील 4-5 दिवस मान्सून पूर्व पाऊस होणार. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता. आज मान्सूनच्या वाटचालीत कोणतीही प्रगती नाही, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल, तपास सुरु
मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन आला आहे. मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे. मंत्रालय कंट्रोल रूमला बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. कथित बॉम्बचा तपास सुरु आहे.
कल्याण ग्रामीण भागात बैलगाडा शर्यती सुरूच
डोंबिवली जवळील अंतार्ली गावात कोरोना नियम बाजूला सारत बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली असताना न्यायालयाचे आदेश झुगारून कल्याण ग्रामीण भागात बैलगाडा शर्तींचे आयोजन केले गेले आहे.तर स्थानिक मानपाडा पोलिसांना याबाबत काहीच माहिती नसल्याचं समोर आलय