Breaking News LIVE : लातूर जिल्ह्यात आज नवीन 48 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
Breaking News LIVE Updates, 3 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
पूजाच्या कुटुंबाकडून माझी हत्या होण्याची शक्यता, शांताबाई राठोड यांचा गंभीर आरोप
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात वादंग उठलं आहे. या घटनेला आज 19 दिवस उलटून गेले आहेत. या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. पूजाच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करायला गेलेल्या पूजाच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या परिवारावर गंभीर आरोप केले आहेत. पूजाच्या कुटुंबाकडून माझी हत्या होण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप शांताबाई राठोड यांनी केला आहे.
Ramesh Jarkiholi | बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल
बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. नोकरीच्या निमित्ताने जवळीक साधून युवतीवर अत्याचार केल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीच्या आमिषाने युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. दिनेश कलहळ्ळी यांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अनैतिक संबंधाची सीडी सार्वजनिक केली आहे.
Congress | बंगालच्या आघाडीवरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत घमासान, जी-23 गटाच्या आनंद शर्मांची जाहीर टीका
निवडणुकीची लढाई पश्चिम बंगालमध्ये सुरु झालीय. पण तलवारी उपसल्या जातायत काँग्रेस पक्षातच. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसनं जी निवडणूकपूर्व आघाडी केली आहे त्यावर पक्षाचेच ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी जाहीरपणे टीका केली आहे. आनंद शर्मा हे सोनिया गांधींना पक्षाच्या अवस्थेबद्दल पत्र लिहिणाऱ्या जी23 गटाचे एक महत्वाचे सदस्य. बंगालमध्ये काँग्रेस-डावे- आयएसएफ अशा तीन पक्षांची एकत्रित आघाडी झालीय. त्यात आयएसएफला सोबत घेण्यावरुन आनंद शर्मांनी नाराजी व्यक्त केलीय.
'गोकुळ'च्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा, पुन्हा हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्य सरकारच्या अध्यादेशामुळे आधीच वादाच्या भोवर्यात अडकलेल्या कोल्हापूर दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती आर.डी. धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता या निवडणुका अधिक काळ थांबवता येणार नाहीत आपल्याला आता कोरोना सोबत जगायला शिकायला हवं असे स्पष्ट केलं. त्यामुळे आता या निवडणूक कार्यक्रमात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टानं नकार दिल्यानं अखेर संचालक मंडळानं यासंदर्भात दाखल केलेली आपली याचिका मागे घेतली.