Breaking News LIVE : पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद
Breaking News LIVE Updates, 28 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह या ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
चिंताजनक! राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 35 हजारहून अधिक कोरोना बाधित
राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 35 हजारहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज तब्बल 35 हजार 726 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात आज मध्यरात्रीपासून रात्रीची जमावबंदी करण्यात आली आहे. तर औरंगाबाद शहरात 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली तर राज्यातही लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज नवीन 14 हजार 523 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 2314579 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 3,03475 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 86.58% झाले आहे.
राज्य सरकारचं Mission Begin Again; रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी
शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात सातत्यानं वाढणारे कोरोना रुग्णांचे आकडे पाहता सरकारकडून Mission Begin Again काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य शासनानं लॉकडाऊनचा पर्याय तूर्तास दूरच ठेवला आहे ही बाब महत्त्वाची. 27 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणारे हे निर्बंध 15 एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत.
गोकुळ निवडणूक : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या 'त्या' वक्तव्याने कार्यक्रमात एकच हशा
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी अगदी शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील कोणता नेता कोणत्या गाडीसोबत उभा राहणार याची गणितं सुरू झाली आहेत. बैठकांचे सत्र दिवस-रात्र सुरू आहे. अशावेळी कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार विश्वास पाटील यांनी हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या कुस्तीवर लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. पुस्तक प्रकाशन सोहळा लांबल्यामुळे सतेज पाटील भाषणाला उभे राहिले. भाषण करताना सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात देखील दुधाची कुस्ती सुरू झाली आहे. बैठकीला उशीर झाल्यामुळे अनेक पैलवान आमची वाट बघत आहेत. त्यामुळे आम्हाला कार्यक्रमातून बैठकीला जाण्याची परवानगी द्यावी. आमचे वस्ताद हसन मुश्रीफ साहेब आहेत. ते आपल्या भाषणात शेवटचा पट सांगतील. सतेज पाटील असं म्हणतात शाहू स्मारक सभागृहांमध्ये एकच हशा पिकला.
पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 8 हजार 292 कोरोना रुग्णांची नोंद तर 42 बाधितांचा मृत्यू झाला आहे. ही आतापर्यंतची एका दिवसात आढळून आलेली सर्वाधिक वाढ आहे. पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद झालीय.
पालघरमध्ये उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई
पालघर जिल्ह्यात कोरोना चा आकडा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लादण्यात आले असूनही,, काही नागरिक या निर्बंधांचे उल्लंघन करत असून आज पालघर चे जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ आणि पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी अचानक पणे अंधार पडल्यावर पालघर मधील समुद्रकिनाऱ्यांवर धाड टाकली यावेळी नांदगाव बीचवर उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली
सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे 31 मार्चला करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
दुपारी बारा वाजता मुंबई येथील पक्ष कार्यालयात होणार प्रवेश सोहळा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची माहिती. वैशाली माडे 'झी'च्या 'सारेगमप' हिंदी आणि मराठी स्पर्धेच्या विजेत्या. त्यासोबतच संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील 'पिंगा' या गीतामूळे मिळाली वेगळी ओळख.
कोरोनाचा उद्रेक सुरूच
कोरोनाचा उद्रेक सुरूच. पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच एका दिवसात दोन हजारांचा टप्पा ओलांडला. आज 2275 रुग्णांची नोंद. गेल्या वर्षी एका दिवसांत 1500 च्यावर रुग्ण आढळले नव्हते. दुसरी लाट शहरवासीयांचं चांगलंच कंबरडे मोडले.
वाळू माफियांचे धाबे दणाणले, अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 60 लाखाच्या फायबर बोटी नष्ट
दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरून वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी या वाळू माफियांच्या तब्बल 60 लाख रुपये किमतीच्या यांत्रिकी सायबर बोटी जिलेटिनचा स्फोट घडवून आणून नष्ट केल्या आहेत. राजेगावच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात तडीपार आरोपी विष्णू उर्फ लाला बलभीम अमनर हा तडीपार आदेशाचे उल्लंघन करून काही साथीदारांसह अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने भीमा नदीच्या पात्रातच छापा घातला. यावेळी त्या ठिकाणी आढळलेल्या यांत्रिकी फायबर बोटी महसूल कर्मचाऱ्याच्या मदतीने जिलेटिनचा स्फोट घडवून नष्ट केल्या आहेत. दौंड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार संतोष शिंदे करीत आहे.