Breaking News LIVE : अकोला शहरात अल्पवयीन मुलाकडून आपल्या रूममेटची गळा आवळून हत्या
Breaking News LIVE Updates, 20 June 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यात शनिवारी 8,912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 257 रुग्णांचा मृत्यू
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.76 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 257 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.97 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,93,12,920 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,63,420 (15.17 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,06,506 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,695 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
तृतीयपंथीसाठी ठाणे महापालिकेचं राज्यातील पहिलं विशेष लसीकरण सत्र
देशात सध्या कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे. अशातच कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हेच शस्त्र असल्याचं वैज्ञानिकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तसेच तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम जलद करण्याचा प्रयत्न वारंवार प्रशासनाकडून केला जात आहे.
लसीकरण मोहिमेंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात तृतीयपंथीसाठीचं राज्यातील पाहिलं कोरोना प्रतिबंधक लसीकरण सत्र काल (शनिवारी) ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रात पार पडलं. यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के, आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची उपस्थिती होती. शहरातील तृतीयपंथी लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने या विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेंतर्गत स्वतःचे आधारकार्ड आणि इतर कोणतेही ओळखपत्र असणाऱ्या तसेच ओळखपत्र नसलेल्या तृतीयपंथीना देखील महापालिकेच्या या लसीकरण केंद्रावर लस देण्यात आली. आज एकूण शहरातील 16 तृतीयपंथीना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी सर्व तृतीयपंथीनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, अशी अनेकांची इच्छा असू शकते, पण हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेचे प्रश्न आम्ही मांडतोय. सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो, पण बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ.
आषाढी वारीला पायी जाऊ द्या या मागणीसाठी भाजप अध्यात्मिक आघाडी उद्या राज्यपालांची भेट घेणार
आषाढी वारीला पायी जाऊ द्या या मागणीसाठी भाजप अध्यात्मिक आघाडी उद्या राज्यपालांची भेट घेणार
अकोला शहरात अल्पवयीन मुलाकडून आपल्या रूममेटची गळा आवळून हत्या
अकोला शहरातील सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलाने आपल्या रूममेटची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे खासगी कोचिंग क्लासेस क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रतीक लवंगे असे मृतकाचे नाव असून आरोपी व मृत मुलगा दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हील लाईन पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर परिसरातील एका भाड्याच्या खोलीत बुलढाणा जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुले नीट परीक्षेच्या तयारीकरिता राहायला आले होते. हे दोघेही नवयुवक जीवलग मित्र असल्याने एकाच खोलीत भाड्याने राहत होते. 17 जून रोजी कुठल्या तरी कारणावरून आपसात वाद झाला आणि या वादातच प्रतीक लवंगे या युवकाची त्याच्या मित्राने गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पावसाची रिपरिप सुरु होताच नाशिकमध्ये पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात
पावसाची रिपरिप सुरु होताच नाशिकमध्ये पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात, पोलिस आणि वनविभागाकडून कारवाईला सुरुवात, कालपासून 32 पर्यटकांवर त्रयंबकेश्वर पोलिसांकडून कलम 188 अंतर्गत कारवाई, त्र्यंबकेश्वर-घोटी महामार्गावर पोलिसांची नाकाबंदी
सातारा : महाबळेश्वर, पाचगणीला पाणी पुरवठा करणारे वेण्णालेक भरलं
सातारा : महाबळेश्वर, पाचगणी वासियांसाठी आनंदाची बातमी, महाबळेश्वर, पाचगणीला पाणी पुरवठा करणारे वेण्णालेक भरलं, सलग पडलेल्या पावसामुळे लवकर भरले वेण्णालेक