Breaking News LIVE : रिक्षातून घरी जात असताना चोरट्याने मोबाईल खेचल्याने एका महिलेचा मृत्यू
Breaking News LIVE Updates, 10 June 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Corona Cases : राज्यात बुधवारी 10,989 नवीन रुग्णांचे निदान; तर 16,379 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात बुधवारी (9 जून) कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत काहीशी वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच काल कालपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात काल 10 हजार 989 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 16 हजार 379 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी (8 जून) राज्यात 10219 रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 55,97,304 इतकी झाली आहे तर रिकव्हरी रेट 95.45 टक्के झाला आहे. काल 261 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण 1,61,864 सक्रीय रुग्ण आहेत. सध्या राज्यात 11,35,347 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,494 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील पाच महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यात 10 पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईतील मालाडमध्ये एका दुमजली चाळीचा भाग कोसळला, काही जण अडकल्याची भीती
मुंबईत मुसळधार पावसामुळे एका दुमजली चाळीचा काही भाग कोसळला आहे. मालाडच्या मालवणीमध्ये ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे. काही जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलं असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकूण दोन ते तीन कुटुंब याठिकाणी राहत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिसर दाटीवाटीचा असल्याने घटनास्थळी पोहोचण्यासाठी असलेला रस्ता अरुंद असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहे. अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्या, जेसीबी घटनास्थळापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरु केले आहे. आजूबाजूच्या घरांनाही धोका असल्याने तेथील रहिवाशांना हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
पायी वारी सोहळ्याला आळंदी ग्रामस्थांचा विरोध
पायी वारी सोहळ्याला आळंदी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. यंदाही पालखी सोहळा हा एसटीतूनच पंढरपूर जावा, अशी मागणी राज्य सरकार, आळंदी देवस्थान आणि जिल्हा प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे. दुसरी लाट परदेशातून आली, पण तिसऱ्या लाटेला आपण जबाबदार ठरायला नको. कुंभमेळा, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक, ग्रामपंचायत निवडणुकांचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. तेव्हा पायी वारीचा अट्टाहास वारकरी संप्रदायाची अवहेलना आणि बदनामीला कारणीभूत ठरेल. असं ग्रामस्थांनी निवेदनात म्हटलंय.
QS जागतिक विद्यापीठ मानांकनात देशातील तीन विद्यापीठांना पहिल्या दोनशेमध्ये स्थान, पंतप्रधानांकडून अभिनंदन
विद्यापीठांसाठीच्या QS या जागतिक मानांकनांमध्ये 2022 मध्ये, भारतातील 3 विद्यापीठांनी पहिल्या दोनशेमध्ये स्थान मिळवले आहे. तर संशोधनाबाबत बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था जगात सर्वोत्कृष्ट ठरली आहे. QS म्हणजे क्वाकारेली सायमंड्स ही संस्था जागतिक पातळीवर उच्चशिक्षण संस्थांचे विश्लेषण करते. या संस्थेने आज जगभरातील शैक्षणिक संस्थांसाठी अठरावी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ मानांकने जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी ( भारतीय तंत्रज्ञान संस्था )-मुंबई, आयआयटी दिल्ली आणि आयएससी (भारतीय विज्ञान संस्था) बेंगळुरूचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं की, आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था)-मुंबई, आयआयटी दिल्ली आणि आयएससी (भारतीय विज्ञान संस्था) बंगळुरूचे हार्दिक अभिनंदन ! भारतातील अधिकाधिक विद्यापीठे व शिक्षणसंस्थांनी जागतिक गुणवत्तेच्या मापदंडां वर उत्कृष्ट ठरावे आणि तरुणाईतील बौद्धिक श्रीमंतीला पाठबळ द्यावे, या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.
राज्यातील सरकारी वकील बदलण्याचा राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय
राज्यातील सरकारी वकील बदलण्याचा राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय. अखेरीस फडणवीस सरकारच्या काळातील वकील बदलले जाणार. दुय्यम न्यायालय, मुंबई नगर दिवाणी न्यायालय, सत्र न्यायालय आणि जिल्हा न्यायालयातील सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी वकील नेमले जाणार. अनेक सरकारी वकीलांची मुदत संपूनही ते कार्यरत आहेत. फडणवीस सरकारच्या काळात नेमणूक झालेल्या वकिलांबाबत वेळोवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आक्षेप घेतला होता. निरपेक्ष विचारांच्या वकिलांची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात येत होती. अखेरीस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला.
रिक्षातून घरी जात असताना चोरट्याने मोबाईल खेचल्याने एका महिलेचा मृत्यू
रिक्षातून घरी जात असताना चोरट्याने मोबाईल खेचल्याने एका महिलेचा मृत्यू. नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल.
हे चोरटे दुचाकीवरून आले होते, त्यांनी रिक्षात बसलेल्या कनमिला रायसिंग हिचा मोबाईल हिस्कवला. मात्र, यावेळी झालेल्या झटापटीत कनमिला रिक्षातून खाली पडली, त्यात तिच्या डोक्याला दुखापत झाली, शेवटी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. ही महिला मुंबईतील कालिना परिसरात राहते. घटना घडली तेव्हा तिच्यासोबत रिक्षात अजून एक मैत्रीण देखील होती. सध्या पोलिसांनी तपास पथके तयार करून चोरट्याचा शोध घेत आहेत.
बारामती : गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार, तर एक जण गंभीर
बारामती : गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार, तर एक जण गंभीर, पुणे सोलापूर महामार्गावरील भिगवणजवळील डाळज नंबर 3 मधील घटना, पुण्याहून लातूरला जाताना अपघात, संध्याकाळी 7 च्या सुमारासची घटना, मृतांची ओळख अद्याप पटली नाही
पुढील काही तासात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पाऊस
पुढील काही तासात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पाऊस ,
पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातही पावसाची हजेरी ,
लातूर, बीड, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता,
पश्चिम विदर्भातील अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस
जालना : पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू
जालना : पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू, बदनापूर तालुक्यातील कुसळी गावची घटना, घराजवळील खदानीमध्ये पावसाने साचलेल्या पाण्यात बुडून तीन सख्या भावंडांचा मृत्यू, मयतांची नावे मनोज अंकुश वैद्य (11वर्ष ), दीपाली अंकुश वैद्य ( 10वर्ष) आकाश संजय वैद्य वय (7वर्ष )