Breaking News LIVE : पालघर : चिंचणी बीचवर मद्यपी पर्यटकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती
Breaking News LIVE Updates, 11 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची चिखलात उतरून भात रोवणी; आधुनिक पद्धतीने भात लागवड करण्याचे आवाहन
गडचिरोली : जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने भात रोवणीच्या कामांना वेग आला आहे. शनिवारी जिल्हाधिकारी दीपक सिंगला साखरा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी चक्क चिखलात उतरून भात (धान) लागवड केली. श्री पद्धतीने भात लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी श्री पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी केले.
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी साखरा गावातील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष भात रोवणी केली. जिल्ह्यातील दमदार पावसानंतर सर्वच शेतकऱ्यांनी भात रोवणीला जिल्ह्यात सुरुवात केली आहे. साखरा गावात कृषी विभागाने आयोजित केलेल्या रोवणी कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी आता यांत्रिकीकरण स्विकारले पाहिजे असे आवाहन शेतकऱ्यांना केले. परंपरागत शेतीमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते, तसेच उत्पन्नही काही अंशी कमी राहते. यातून बाहेर पडून शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी जेणेकरून उत्पन्नही वाढेल आणि मेहनतही कमी करावी लागेल, असे ते यावेळी म्हणाले. साखरा येथे झालेल्या युवराज उंदीरवडे यांच्या शेतातील रोवणी कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्ड जिल्हा प्रमुख राजेंद्र चौधरी, कृषी अधिकारी अरूण वसवाडे, बालाजी कदम, पी.पी.वाहने आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
Maharashtra Corona Update : राज्यात काल (शनिवारी) 8296 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर 6026 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात काल (शनिवारी) 8 हजार 296 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 26 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 06 हजार 466 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.05 टक्के आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 179 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 35 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 14 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. चार जिल्ह्यामध्ये कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आली आहे. यामध्ये यवतमाळ (20 ), हिंगोली ( 80 ), गोंदिया ( 81 ) नंदूरबार (97 ) या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.
रायगड : मुरूड तालुक्यातील काशीद येथील नाल्यावरील लहान पूल कोसळला, एकाचा मृत्यू
रायगड : मुरूड तालुक्यातील काशीद येथील नाल्यावरील लहान पूल कोसळला, अपघातात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मोटारसायकलस्वाराचा मृत्यू, विजय चव्हाण याचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसात बैलगाडीसह शेतकरी गेला वाहून, बिलोली तालुक्यातील घटना
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसात बैलगाडीसह शेतकरी गेला वाहून, बिलोली तालुक्यातील घटना.
पालघर : चिंचणी बीचवर मद्यपी पर्यटकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती
पालघर जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी असून आज रविवारची सुट्टी असल्याने चिंचणी बीचवर काही पर्यटक बाहेरून पर्यटनासाठी आले होते. हे पर्यटक मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असल्याचे पोलिसांना आढळून आल्यावर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली. मात्र, ह्या मद्यपी पर्यटकांनी पोलिसांवरच हल्ला केल्याचे समोर आले आहे. सध्या चिंचणी खाडी नाका पोलीस चौकीमध्ये कारवाई सुरू आहे.
बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी..
बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी.. बीड जिल्ह्यातील काही भागात पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढवलं होतं, मात्र मागच्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. आज दुपारपासून बीड जिल्ह्यात पुन्हा दमदार पावसाने सुरुवात केली आहे. बीड शहरामध्ये मध्यम स्वरूपात तर अंबाजोगाई तालुक्यात परळी आणि माजलगाव परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे
कोल्हापूर : राज्य सरकारने व्यापाऱ्यांची परीक्षा न बघता दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी, ललित गांधी यांचं आवाहन
कोल्हापूर : व्यापाऱ्यांमुळे कोल्हापुरातील कोरोना वाढत नाही हे सिद्ध झालं आहे. पाच दिवस दिलेल्या परवानगीमध्ये जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढली नाही. राज्य सरकारने व्यापाऱ्यांची परीक्षा न बघता लवकरात लवकर आदेश काढावेत. व्यापाऱ्यांची उद्यापासून दुकाने सुरू करण्याची सर्व तयारी झाली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांचं आवाहन