Breaking News LIVE | वाशिम जिल्ह्यात आजपासून रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी
Breaking News LIVE Updates, 20 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
भाजपचा कुठलाही कार्यकर्ता बांग्लादेशचा नाही, पण, तुमच्या अध्यक्षा कुठल्या देशाच्या? : आशिष शेलार
भाजपचे काही लोक गोमातेची तस्करी करत असल्याचे समोल आलंय तर काही आयएसआय एजंटही सिद्ध झाले आहेत. पण, आता भाजपच्या मुंबईतील अल्पसंख्यांक कक्षाचे अध्यक्ष रुबेल शेख हे बांग्लादेशी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. दरम्यान, यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी पलटवार करत उत्तर दिले आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. भाजपचा संघजिहाद, भाजप काही लोक गोमातेची तस्करी करत असल्याचं सिद्ध झालंय तर काही आयएसआय एजंट असल्याचेही समोर आलं आहे.
भंडारा जळीत कांडात प्रशासन जबाबदार असताना फक्त दोन नर्सला बळीचा बकरा बनवण्यात आलंय : चंद्रशेखर बावनकुळे
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात 8 जानेवारीच्या मध्यरात्री आग लागून 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. आज तब्बल 39 दिवसानंतर दोन कंत्राटी नर्सवर या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, भंडारा जळीत कांडात दोन नर्सवर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी स्वत:चा बचाव केलाय. अग्निशमन यंत्रणा चालत नव्हती, प्रशासन जबाबदार असताना फक्त दोन नर्सला बळीचा बकरा बनवण्यात आलंय, असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तर दोषी डॉक्टरवर गुन्हा का नाही, असा सवाल नर्सेसनी उपस्थित केला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून पळ काढण्यासाठी ठाकरे सरकारकडून कोरोनाचा बाऊ : सदाभाऊ खोत
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून पळ काढण्यासाठी सरकारकडून कोरोनाचा आता बाऊ केला जातोय. कोरोनाचा बाऊ करूया आणि आठवड्याभरातच अधिवेशन गुंडाळुया असा सरकारचा विचार आहे, असे खोत म्हणालेत. कोरोना काळात या सरकारने दारूतून जास्त कर मिळतोय म्हणून दारूची दुकाने सुरू केली आणि मंदिरे बंद ठेवली, म्हणून महाविकास आघाडीचे सरकार हे दारुडं सरकार आहे, असे खोत म्हणाले.