Breaking News LIVE | करोनाची इतिश्री अद्याप झाली नाही; सातत्याने सावधगिरी बाळगण्याचे राज्यपालांचे आवाहन
Breaking News LIVE Updates, 16 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
माझ्याविरोधातील देशद्रोहाचे आरोप बिनबुडाचे, कंगनाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
माझ्याविरोधातील देशद्रोहाचे सारे आरोप हे बिनबुडाचे आहेत. माझ्या ट्विटमुळे कोणाच्या काय भावना दुखावल्या? कुठे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली? असे सवाल उपस्थित करत कंगना रनौतनं मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं. वांद्रे कोर्टानं कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यानं या दोन्ही बहिणींनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे.
कोरोना फोफावतोय, कठोर निर्णय घ्यावे लागतील; अजित पवारांचे संकेत
राज्यात कोरोना (CoronaVirus) रुग्णसंख्या पुन्हा एकदा डोकं वर काढू लागली आहे. त्यामुळं या धर्तीवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून पुन्हा एकदा कठोर निर्णय घ्यावे लागतील असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. राज्यात डिसेंबरनंतर रविवारी एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे 4 हजारांहून अधिक कोरोनारुग्ण आढळून आले. रविवारी नव्यानं कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा 4092वर पोहोचला होता. त्यामुळं ही बाब आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाच्या चिंतेत भर टाकून गेली.
अभिनेता संदीप नाहरचा संशयास्पद मृत्यू, अखेरच्या फेसबुक पोस्टमधून अनेक खुलासे
अभिनेता संदीप नाहर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जातं आहे. 'कहने को हमसफर हैं', 'एमएस धोनी', 'केसरी' या चित्रपटांतून संदीप प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. फेसबुकवर जवळपास मृत्यूच्या तीन ते चार तासांपूर्वी त्यांनी एक सोशल मीडिया पोस्टही लिहिली होती. जी पाहता ही त्यांची सुसाईड नोट आहे, असंही मत अनेकांनी मांडलं.
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना हायकोर्टाचा दिलासा
परदेशी विनिमय व्यवस्थापन (फेमा) कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या रडारवर असलेल्या अविनाश भोसले आणि त्यांच्या मुलगा अमित यांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने ताप्तुरता दिलासा दिला आहे. 24 फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश ईडीला दिले आहेत.