Breaking News LIVE : लातूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसातील सर्वात मोठा आकडा समोर
Breaking News LIVE Updates, 19 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
औरंगाबाद कोरोना अपडेट :
औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 1679 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर, तर 20 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे .आज 558 जणांना (मनपा 464, ग्रामीण 94) सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत 54056 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1679 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 65922 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1408 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 10458 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वाशिम अपडेट :
वाशिम जिल्ह्यात रात्री विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस बरसला त्यामुळे सध्या वातावरणात गारवा आहे.
नांदेडमध्ये काल दिवसभरात 947 नवे कोरोनारुग्ण, तर 7 रुग्णांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा धडकी भरवणारा आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना आकडेवारीमुळे सामान्य माणसाच्या जीवाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. कारण काल दिवसभरात जवळपास 947 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 31 हजार असून जवळपास 6 हजार रुग्ण सध्या उपचार घेत असून मृत्यू संख्या 625 वर पोहचलीय.
परमबिर सिंह प्रकरण आणि राज्यातील राजकीय स्थितीचा अहवाल महाराष्ट्र प्रभारी काँग्रेस नेतृत्वाला दिल्लीला पाठवणार
परमबिर सिंह प्रकरण आणि राज्यातील राजकीय स्थितीचा अहवाल महाराष्ट्र प्रभारी काँग्रेस नेतृत्वाला दिल्लीला पाठवणार. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी आज राज्यातील स्थितीबाबत आणि परमबिर सिंह प्रकरणाबाबत राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. पाटील यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर एच. के. पाटील आपला अहवाल केंद्रीय नेतृत्वाला पाठवणार.
लातूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसातील सर्वात मोठा आकडा समोर
लातूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसातील सर्वात मोठा आकडा समोर आला आहे. मागील 24 तासांत 377 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील उपचार घेत असलेले बाधित रुगणाची संख्या 2 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. लातूर जिल्ह्यात 1141 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 159 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 261 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 1634 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 218 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28287 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 2035 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 722 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 25530 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 143 आहे.
नांदेड जिल्ह्यात 24 मार्चपासून 11 दिवसांची संचारबंदी...
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करत लिहिलं, 'नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्शिती चिंताजनक होते आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्यांसमवेत आज सकाळी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली. कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश मी या बैठकीत दिले.'
पुण्यातही अवकाळी पावसाची हजेरी
पुण्याच्या मावळ तालुक्यात ही अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट ही झाली. मावळ तालुका हा पर्यटनासाठी ओळखला जातो, त्यात आज सुट्टीचा दिवस असल्याने या गारपिटीत पर्यटकांनी आनंद घेतला. गेली अनेक दिवस नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत, या गारपिटीने मात्र ते सुखावले आहेत.
भिवंडीत अय्यपा मंदिरात चोरी, चोरट्यांनी दानपेटी फोडली
भिवंडी शहरातील वऱ्हाळ देवी रोड येथील अय्यपा मंदिरात मागील दरवाजा फोडून शिरलेल्या चोरट्यांनी मंदिरातील चार दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरी केल्याची घटना समोर आली आहे. वऱ्हाळ चौक या ठिकाणी हे मंदिर असून सकाळी नियमित पूजा करण्यासाठी मंदिराचे पुजारी यांनी मुख्य दरवाजा उघडला असता त्यांना मंदिरातील चार दान पेट्या फोडल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बाब तात्काळ मंदिर व्यवस्थापक विश्वनाथ शेट्टी यांना कळविली असता त्यांनी शहर पोलिसांना खबर दिली. या मंदिराचा मागील लाकडी दरवाजा लोखंडी पाईपाने तोडून आत शिरलेल्या चोरट्यांनी मंदिरातील चार दानपेटी फोडून त्यातील रक्कम काढली त्यापैकी एक दानपेटी उघडली न गेल्याने चोरट्यांनी ती दानपेटी काही अंतरावर नेऊन दगड आपटून दानपेटी फोडली. या चोरीच्या घटनेबाबत मंदिर व्यवस्थापक विश्वनाथ शेट्टी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या मंदिरातील सीसीटीव्हीचे डिव्हीआर रेकॉर्डिंग बंद असल्याचे आढळून आले आहे. शहर पोलीस ठाणे अंतर्गत वऱ्हाळ देवी चौक या परिसरात नियमित गस्त व बंदोबस्त असतानाच शनिवारी रात्री या ठिकाणी नाकाबंदी सुध्दा करण्यात आली असतानाही त्यापासून हाकेच्या अंतरावरील मंदिरात चोरी झाल्याने भक्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे.