कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टात विनाकारण गर्दी करू नका, प्रभारी मुख्य न्यायमूर्तींचे आदेश
मुंबई उच्च न्यायालयात तीन हजारापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची संख्या असून शेकडो वकील आणि पक्षकार हायकोर्टात दररोज विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी येत असतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हायकोर्टात विनाकारण गर्दी करू नका असे आदेश प्रभारी मुख्य न्यायमूर्तींनी दिले आहेत.
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस फोफावत जाणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढू नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयानही आता खबरदारी घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी, वकिलांनी, पक्षकारांनी हायकोर्टात विनाकारण गर्दी करु नये, असे आदेश प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी दिले आहेत. या संदर्भातील अधिसूचना शनिवारी काढण्यात आली असून पुढील आठवडाभर केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेण्यात येईल, असं जाहीर करण्यात आल आहे. हा आदेश मुंबईसह नागपूर, औरंगाबाद आणि गोवा हायकोर्टालाही लागू होईल. त्याचबरोबर बायोमेट्रिक पद्धतीने हायकोर्टातील कर्मचाऱ्यांची घेण्यात येणारी हजेरीही तुर्तास बंद केली, असून नियमित मस्टरवर नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात तीन हजारापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची संख्या असून शेकडो वकील आणि पक्षकार हायकोर्टात दररोज विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी येत असतात. राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना व्हायरस आणखी बळावू नये यासाठी जागतिक आरोग्य संघटना, केंद्र तसेच राज्याच्या आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
याची गंभीर दखल घेत याचिकाकर्ते, वकील, स्टाफ मेंबर्स आणि पक्षकार यांच्या सुरक्षेकरीता प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या निर्देशांवरून रजिस्टार जनरल एस. बी. अग्रवाल यांनी हे नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यानुसार 16 मार्चपासून आठवडाभरासाठी केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेतली जाणार आहे. गरज असल्यास तातडीच्या प्रकरणासाठी पक्षकारांनी आपल्या वकीलांमार्फत कोर्टात प्रकरणे सादर करावीत. हजेरी अत्यावश्यक असल्यास एका प्रकरणासाठी एकाच पक्षकारानं हजेरी लावावी. तसेच प्रलंबित खटल्यांच्या पुढील सुनावणीची तारीख ही पक्षकारांना ऑनलाईनही पाहता येईल.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या 31 वर गेली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यापैकी पुण्यात- 10, मुंबई- 5, पनवेल- 1, कल्याण- 1, नवी मुंबई- 1, नागपूर- 4, ठाणे- 1, यवतमाळ- 2, अहमदनगर- 1 रुग्ण आढळले आहेत.
नव्या आकडेवारीनुसार एकूण 99 रुग्ण देशभरात आढळले आहेत. यामध्ये महाराष्ट्र 31, केरळ 19, हरियाणा 14 (सर्व परदेशी नागरिक), उत्तर प्रदेश 12, दिल्ली 7, कर्नाटक 6, राजस्थान 3, पंजाब 1, जम्मू काश्मीर 1, लडाख 3, तामिळनाडू 1, तेलंगणा 1 यांचा समावेश आहे.
कोरोनाचे देशात दोन बळी
भारतात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. काल दिल्लीतील 68 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. अहमदनगरमध्ये एका रूग्णाला कोरोनाची लागण झाली आहे, तर मुंबईतही आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत आता 4, पुण्यात 10, नागपुरात 3 तर ठाण्यात एकाला कोरोनाची लागण झाली आहे. आता राज्यात एकूण 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
शहरी भागातील शाळा-महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद
राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याकाळात मंडळ परिक्षा सुरू राहतील, असं स्पष्ट करताना परीक्षांच्या काळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत याची खबरदारी पालक आणि शाळांनी घ्यायची आहे. राज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायिक, यात्रा, धार्मिक, क्रीडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं.