(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आनंद अडसूळांना तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Shiv Sena Ex MP Anandrao Adsul) सिटी को.ऑ. बँकेचे अध्यक्ष असताना बँकेत सुमारे 900 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आमदार रवी राणा यांनी केली होती.
मुंबई : सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर सुरू झालेला ईडीचा ससेमीरा चुकवण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Shiv Sena Ex MP Anandrao Adsul) यांना तातडीचा कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. मात्र अडसूळांना याचिकेत दुरूस्ती करणंयाचे निर्देश देत सुनावणी 8 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली आहे. ईडीनं अद्याप आपल्याला याप्रकरणी दाखल ईसीआयआरची कॉपी दिलेली नाही, त्याची मागणी आता अडसूळ याचिकेत नव्यानं करणार आहेत. मात्र अडसूळ हे केवळ नाटक करत असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा ईडीच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला. अश्याप्रकारे लोकप्रतिनिधी राहिलेले अडसुळ जर तपासकामात अडथळा आणत असतील तर तपास कसा करणार?, असा सवालही यावेळी एएसजी अनिल सिंह यांनी उपस्थित करत अडसुळांच्या याचिकेला जोरदरा विरोध केला. त्यामुळे न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे.जमादार यांनी अडसूळांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत या याचिकेवर पुढील शुक्रवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ सिटी को.ऑ. बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत सुमारे 900 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आमदार रवी राणा यांनी केली होती. त्यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ईडीच्या अधिकार्यांनी 27 सप्टेंबरला सकाळी अडसूळ यांच्या मुंबईतील राहत्या घरी आणि कार्यालयावर धाडी टाकून चौकशी सुरू करतात अडसूळ यांची तब्येत अचानक बिघडली. आणि त्यांना गोरेगावच्या लाईफलाईन केअर रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरूवारी त्यांना तिथून डिस्चार्ज देत जवळच्याच एसआसव्ही रूग्णालयात हलवण्यात आलं. दरम्यान याप्रकरणीत दाखल ईसीआयआर रद्द करावा आणि अटकेपासून संरक्षण द्यावं अशी मागणी करत अडसुळांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
आनंदराव अडसूळ यांच्यावतीने अॅड. अभिनव चंद्रचुड यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितलं की, सिटी बँकेच्या 900 कोटी रूपयाच्या आर्थिक गैरव्यवहाराशी अडसूळ यांचा थेट कसलाही संबंध नाही. केवळ राजकीय प्रतिस्पर्ध्याच्याविरोधात अडसूळ यांनी जातपडताळणी प्रमाणपत्राची तक्रार केल्यानंच राजकीय सुडबुध्दीनं ही खोटी तक्रार करण्यात आली आहे. तसेच अडसुळ यांची प्रकृती वयोमानानुसार ढासळल्यानं त्यांना रूगणलयात दाखल करण्यात आले आहे. मात्र रूग्णालबाहेर ईडीचे अधिकारी सशस्त्र पाहारा देत अडसूळ बाहेर पडायचीच वाट पाहत आहेत. त्यामुळे याच धर्तीवर त्यांना ईडीच्या कारवाई पासून तूर्तास दिलासा द्यावा अशी विनंती कोर्टाकडे केली गेली. तर ईडीच्यावतीनं अतिरिक्त सॉलीसिटर जनरल अनिल सिंग यांनी या याचिकेलाच जोरदार विरोधात केला. बँकेच्या गैरव्यवहारासंबंधी तक्रार आल्यानंतर ईडीनं आपली चौकशी सुरू केली, या चौकशीचा निवडणूक प्रकरणी अडसूळ यांनी केल्या तक्रारीशी काही संबध नाही. ईडीनं यापूर्वीही त्यांना चौकशीला हजर रहाण्याचे समन्स बजावलं होतं. त्यामुळे केवळ कारवाई टाळण्यासाठीच त्यांनी हा प्रकृती अस्वस्थ्याचा बनाव रचत रूग्णालय गाठलं आहे. हे प्रकार असेच सुरू राहीले तर तपासयंत्रणेने चौकशी कशी करायची?, असा सवालही एएसजी अनिल सिंह यांनी उपस्थित केला.