(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dr. Payal Tadvi Suicide Case : दोन आरोपी डॉक्टरांना सशर्त स्वगृही परतण्यास हायकोर्टाची परवानगी
वरिष्ठ सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवीनं नायर रुग्णालयाच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
मुंबई : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येप्रकरणातील आरोपींपैकी दोन महिला आरोपी डॉक्टरांनी दाखल केलेला अर्ज स्विकारात मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयानं दोन्ही आरोपींना सशर्त स्वगृही राहण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यापुढे यावर सुनावणी पार पडली.
वरिष्ठ सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवीनं नायर रुग्णालयाच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींना ऍट्रॉसिटी आणि रॅगिंग प्रतिबंधक कायद्यांन्वय अटक करण्यात आली. कालांतरानं या तिघींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करताना कठोर अटीशर्ती घातल्या होत्या. त्यामध्ये सूट मिळावी, म्हणून डॉ. भक्ती मेहर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी अपील दाखल केलं होतं. या दोघींनी नायर रुग्णालयातून स्त्रीरोगतज्ज्ञ विषयात आपले पदव्युत्तर शिक्षण 10 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण केले असून रुग्णलायाच्या नियमावलीनुसार, शिक्षण पूर्ण केल्यानंतर वसतिगृह सोडणं त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. या दोघींची मुंबईत याव्यतिरिक्त राहण्याची दुसरी कोणतीही सोय नाही. दुसरीकडे, हा खटला निकाली लागत नाही तोपर्यंत मुंबईत राहणं अशक्य असल्यामुळे दोघींनाही त्यांच्या मूळ घरी राहण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती या अर्जातून कोर्टाकडे केली होती.
मात्र याला विशेष सरकारी वकिलांकडून आक्षेप घेत त्यांना ही परवानगी दिल्यास खटल्याला विलंब होऊ शकतो. तसेच या खटल्यातील साक्षीदारही विविध ठिकाणाहून आलेले आहेत. खटल्यात त्यांचीही साक्ष महत्वाची आहे. शिक्षण पूर्ण करून ते आपापल्या घरी निघून गेल्यास खटला रखडू शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला होता. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने 7 डिसेंबर रोजी आपला निकाल राखून ठेवला होता, जो मंगळवारी जाहीर केला.
याचिकाकर्त्यांकडे मुंबईत राहण्यासाठी स्वतःचे घर नसले तरी त्यांच्या जिल्ह्यात त्यांचे स्वतःचे घर आहे. ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. खटल्यास अद्याप सुरूवात झालेली नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर याचिकाकर्त्यांना वसतीगृह रिकामे करणे बंधनकारक आहे. अशा परिस्थिती त्यांना मुंबईत राहणेही शक्य नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांचा अर्ज मान्य करत त्यांना मूळ घरी राहण्यास परवानगी देत असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले. मात्र, त्या खटल्याच्या सुनावणीसाठी त्या उपस्थित राहतील अशी हमी, सोबतच त्यांच्या मूळ घराचा पत्ता, घर बदलल्यास त्याचीही माहितीही न्यायालयात सादर करावी, मोबाईल नंबरही द्यावा असे निर्देश देत या सर्व अटीशर्तींची दोन आठवड्यात पुर्तता करण्याचे निर्देश देत हायकोर्टानं ही याचिका निकाली काढली.
काय आहे प्रकरण?
डॉ. पायल तडवीने 22 मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळेच तिने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केल्यामुळे पोलिसांनी 23 मे रोजी गुन्हा नोंदवून नायर रुग्णालयातील तीन सहकारी महिला डॉक्टर भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक केली. आग्रीपाडा पोलिसांनी या तिघिंवर रॅगिंग आणि ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :