एक्स्प्लोर
Advertisement
भाजपच्या 'माझं अंगण रणांगण' आंदोलनाला महाविकास आघाडीकडून 'महाराष्ट्रद्रोही BJP' ट्रेंडनं उत्तर
भाजपनं (Maharashtra BJP) माझं अंगण रणांगण', 'महाराष्ट्र बचाव' अंतर्गत राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केलं. तर भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महाविकासआघाडीनं महाराष्ट्रद्रोही भाजप असं आंदोलन सुरु केलं आहे.
मुंबई : कोरोनाचं संकट राज्यात वाढत चालले आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचं संकट रोखण्यात राज्यातील ठाकरे सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने राज्य सरकारविरोधात आंदोलन केले. ठाकरे सरकारविरोधात घराच्या अंगणात उभं राहून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. 'माझं अंगण रणांगण', 'महाराष्ट्र बचाव' अंतर्गत हे निषेध आंदोलन करण्यात आलं. तर भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महाविकासआघाडीनं महाराष्ट्रद्रोही भाजप असं आंदोलन सुरु केलं आहे. महाराष्ट्रद्रोही BJP हा ट्रेंड ट्विटरवर सुरु केला आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. कोरोनाला रोखण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे. संकट मोठं आहे म्हणून सहकार्य करा, असं सरकारकडून वारंवार सांगितलं जात होतं. त्यामुळे आम्ही आणि सामान्य जनतेनेही सहकार्य केलं. पण आता लोकांच्या मनातील राग अधिक काळ लपवून राहू शकत नाही, असं सांगतानाच ठाकरे सरकारचं अपयश आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यातील सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिले आहेत, असं पाटील यांनी सांगितलं होतं.
दरम्यान आज भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले. सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घराच्याबाहेर उभं राहून काळ्या फिती, काळे झेंडे, रिबन आणि फलक उंचावून सरकारचा निषेध नोंदवला गेला. दुसरीकडे महाविकास आघाडीनं भाजपविरोधात सोशल मीडियावर आंदोलन सुरु केलंय. महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला मोठ्या धीराने सामोरे जात असताना भाजप गलिच्छ राजकारण करत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रद्रोही भाजपा हा ट्रेंड ट्रेंडिंगमध्ये आहे. भाजपच्या आंदोलनाविरोधात पहिल्यांदा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सोशल मीडियावर एकत्र आले आहेत. हा ट्रेंड सध्या देशात तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे.
सरकारबद्दल जनतेत असंतोष : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
भाजपचे आंदोलन महाराष्ट्र बचाओ आंदोलन आहे. हे सत्तेवरच सरकार घालवण्याचे आंदोलन नाही. देशातील 30 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत तर 40% मृत्यू महाराष्ट्रात आहेत. ही राज्य सरकारची निष्क्रियता आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस म्हणाले की, सरकारमधील मंत्री आभासी जगात जगतात. सोशल मीडियावर गँग बनवून आणि काही लोकांना आपले प्रवक्ते बनवतात. सरकारबद्दल जनतेत असंतोष आहे. राज्यात कोरोना रुग्णांना उपचार व्यवस्थित होत नाहीत. अॅम्ब्युलन्स मिळत नाहीत. बेड मिळत नाहीत. महाराष्ट्र आणि मुंबईत प्रचंड मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला आहे. याचा मुकाबला करण्याची सरकारची तयारी नाही, असं फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले बीकेसी सारखं सेंटर दोन दिवसात भरून जाईल. पाऊस पडल्यावर बीकेसी सेंटरचं काय होईल? असा सवाल त्यांनी केला. केंद्राने 20 लाख कोटींचे पॅकेज घोषित केले पण राज्याने एक दमडीचे पॅकेज दिले नाही, असंही ते म्हणाले. कर्नाटक,मध्य ओदिशा, गुजरात, छत्तीसगडने योजना जाहीर केली. पण एक नवा पैसा राज्य सरकार खर्च करायला तयार नाही, असंही ते म्हणाले. राज्य सरकारला अॅडव्हान्समध्ये 3800 कोटी रुपये दिले आहेत. 1600 कोटी मजुरांचे कॅम्प आणि खाण्याची व्यवस्था करण्यासाठी दिले. यातील एक पैसे खर्च केला नाही, असंही फडणवीस म्हणाले. मोफत रेशन केंद्राने दिले असल्याचंही त्यांनी सांगितलं.
खरीप हंगाम आहे शेतकऱ्यांकडे माल पडला आहे. कापूस, चण्यासह शेतीमाल घरी आहे. शेतकरी हवालदिल आहे. जी खरेदी होते आहे त्याचे पैसे केंद्र देत आहे. पण राज्य खरेदी करत नाही. शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार अडचणीत आहेत, असंही फडणवीस म्हणाले.
भाजपचं विविध शहरांमध्ये आंदोलन
औरंगाबाद : राज्यातलं सरकार कोरोनाचा सामना करण्यासाठी कमी पडत आहे. राज्यात अनेक रुग्णांचे हाल होत आहेत, असा आरोप करत औरंगाबादेत भाजपाने आज आंदोलन केलं. हातात वेगवेगळ्या आशयाचे फलक घेऊन आंदोलन केले. आंदोलन करते हातात फलक घेऊन शांत उभे होते. यामध्ये शेतकऱ्यांना मदत करा, सर्वसामान्यांना उपचार द्या यांना अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलन केले. औरंगाबाद वेगवेगळ्या रस्त्यावर आंदोलनकर्ते उभे होते.
नागपूर :नागपुरात कोरोना रोखण्यासाठी शासन प्रशासनकडे निश्चित धोरण नाही. नागपूरचे क्वॉरंटाईन सेंटर हे कोरोना पसरविण्याचे केंद्र झाले आहे. अधिकारी मोठमोठ्या घोषणा करत शासनाची, मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप नागपूर शहर भाजप अध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे. माझे अंगण, माझे रणांगण अंतर्गत नागपुरात आंदोलन केलं. कोरोनाच्या संकटात जनतेचे हाल होत असून त्या विरोधात जनतेचे मुद्दे घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत. आम्ही प्रशासन, शासनाला साथ द्यायला तयार आहोत, अनेक स्वयंसेवी संस्था या कामी मदत करायला तयार आहेत. मात्र महापालिका प्रशासन कोणाचे ही ऐकायला तयार नाही, असं दटके म्हणाले.
चंद्रपूर : हे आंदोलन सरकारची लोकप्रियता वाढविण्यासाठी आणि सरकारला मदत करण्यासाठी आहे. हे आंदोलन सरकार अस्थिर करण्यासाठी नाही तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आहे, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. सध्या कुठलीच निवडणूक नाही मग आम्हाला याचा राजकीय फायदा कसा होईल, असंही त्यांनी म्हटलं. सुधीर मुनगंटीवार यांनी काळं मास्क घालत आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत केले सरकार विरोधात "माझं आंगण, रणांगण" आंदोलन केले.
जालना: जालना येथे भाजपच्या वतीने सरकार विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून मुंडन करत सरकारचा निषेध केला. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांचा मोठी गर्दी झालेली देखील पाहायला मिळाली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात फलकबाजी देखील केली.
इंदापूर / दौंड : भाजपच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनामध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सहभागी होऊन राज्य सरकारच्या विरोधात निषेध नोंदवला. यावेळी माजी आमदार रंजना कुल, कांचन कुल या देखील उपस्थित होत्या. तर इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारच्या विरोधात निषेध नोंदविला. यावेळी त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील हे उपस्थित होते.
भाजपचे गलिच्छ राजकारण जनता कधीही मान्य करणार नाही- महाराष्ट्र कॉंग्रेस
कोरोनाच्या संकटात राज्य सरकार अडचणीत कसं येईल, महाराष्ट्रात गोंधळाचं वातावरण कसं निर्माण होईल याचं दृष्टीने भाजपच्या नेत्यांची कृती असते. संकटकाळात भाजपच्या या वागण्याला महाराष्ट्रद्रोहच म्हणावे लागेल, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र संकटात असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करायची सोडून पीएम केअरला पैसे देणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह असल्याचे महाराष्ट्र कॉंग्रेसनं म्हटलं आहे. कोरोनाविरूद्ध महाराष्ट्र विकास आघाडी सरकार प्राणपणाने लढत असतानादेखील राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. भाजपचे हे गलिच्छ राजकारण जनता कधीही मान्य करणार नाही. उलट ती या चुकीच्या राजकारणाचा निषेध करेल, आणि भाजपला धडा शिकवेल, असंही महाराष्ट्र कॉंग्रेसनं म्हटलंय.
भाजपचे आंदोलन निंदनीय - शिवसेना
भाजपचे अशा प्रकारचे आंदोलन करण्याचे केलेले आवाहन हे निंदनीय आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांनी एकत्रितपणे लढून कोरोनाचा सामना करण्यास सांगत आहेत आणि दुसरीकडे राज्यातील नेते याच गोष्टीचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत. सर्वच जण घरी राहून कोरोनाला परतवून लावण्यात सरकारची मदत करत आहेत. अशा प्रकारचे आंदोलन झाल्यास लॉकडाऊनला काही अर्थ राहत नाही. गुजरातमध्ये घडलेल्या घटनेची आपल्याला पुनरावृत्ती नाही होऊ द्यायची आहे आणि पोलिसांवरील ताण वाढणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायला हवी. विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करून त्यांच्या काही समस्या किंवा सूचना असल्यास राज्य सरकार समोर मांडाव्यात. अशा कठीण परिस्थितीत सर्वांनी एकत्रितपणे कोरोनाचा सामना करून कोरोनारुपी संकटाला परतवून लावणे गरजेचे आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
महाराष्ट्रासाठी झटणाऱ्यांचा अपमान?- जयंत पाटील
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करणार्या भाजपसोबत जावून आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? याचा विचार जनतेने करावा असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. हातात काळं घेताना एकदा तरी विचार करा, आपण अहोरात्र महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा, पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य सेवकांचा अपमान तर करत नाही ना! असा विचारही जनतेने मनात आणावा अशा आशयाचे ट्वीट करून जयंत पाटील यांनी भाजपच्या आंदोलनावर केले आहे.
मातीशी केलेली गद्दारी महाराष्ट्र कधीच विसरणार नाही- धनंजय मुंडे
महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला मोठ्या धीराने सामोरे जात असताना, मातीशी इमान न राखणारे काहीजणं आंदोलन करत आहेत. राज्य कोरोनामुक्त करण्यासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या सर्वांचाच हा अपमान आहे. मातीशी केलेली गद्दारी महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, असं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
रत्नागिरी
बीड
Advertisement