(Source: ECI/ABP News/ABP Majha)
OBC Reservation : उद्या भाजपचं राज्य सरकारविरोधात चक्का जाम तर काँग्रेसचं केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन
OBC Reservation : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. या निर्णयाचं खापर एकमेकांवर फोडलं जात असून उद्या 26 जून रोजी भाजपचं राज्य सरकारविरोधात चक्का जाम आंदोलन आहे तर काँग्रेसकडून केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. या निर्णयाचं खापर एकमेकांवर फोडलं जात असून उद्या 26 जून रोजी भाजपचं राज्य सरकारविरोधात चक्का जाम आंदोलन आहे तर काँग्रेसकडून केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्रातील भाजप सरकारविरोधात काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन
सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून शनिवार 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
"लपून छपून टायर घेऊन या आणि चक्का जाम करा", 26 तारखेच्या OBC आंदोलनासाठी भाजप आमदारांचा अजब सल्ला
नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपवण्यासाठीच काम करतंय
नाना पटोले म्हणाले की, आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे. देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे. ओबीसींचे हे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे. भाजपच्या या ओबीसीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शनिवार 26 जून रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोविड नियमांचे पालन करून आंदोलनात सहभागी होतील असे नाना पटोले म्हणाले.
भाजपकडून 26 जूनला महाराष्ट्रात चक्का जाम
राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द झालं असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. पुरेसे पुरावे आणि बाजू न मांडता आल्याने आरक्षण गेलं असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. तसेच 26 जूनला महाराष्ट्रात चक्का जाम (Maharashtra Chakka Jam Protest) आंदोलन करणार असल्याचं भाजपनं जाहीर केलं आहे. राज्यसरकार केंद्र सरकारला जनगणना देत नाही हे चुकीचं आहे, याचा जनगणनेशी संबंध नाही. वेळकाढूपणा काढणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी तसेच ओबीसींना आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्राभर 26 जूनला भाजप चक्का जाम आंदोलन करणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.