एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोलापूर जिल्हापरिषदेवर पुन्हा भाजप पुरस्कृत समविचार आघाडीचा झेंडा
सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोलापूर जिल्हापरिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीतर्फे अनिरुद्ध कांबळे तर महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे त्रिभूवन धाईंजे यांच्यात लढत झाली.
सोलापूर : पुरेसं संख्याबळ असूनही सोलापूर जिल्हापरिषदेत महाराष्ट्र विकास आघाडी अयशस्वी ठरली आहे. तर जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांवर भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला. भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीचे उमेदवार अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी दिलीप चव्हाण यांचा विजय झाला.
सोलापुर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोलापूर जिल्हापरिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीतर्फे अनिरुद्ध कांबळे तर महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे त्रिभूवन धाईंजे यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत अनिरुद्ध कांबळे यांनी 37 तर धाईंजे यांना 29 मते मिळाली. सोलापुर जिल्हापरिषदेत एकूण 68 सदस्य निवडून आले होते. मात्र 1 सदस्य तुरुंगात असल्याने तर दुसरे सदस्य संजय शिंदे विधानसभेत निवडून आल्याने सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आज सभागृहात 66 सदस्यांनी मतदान केलं. सत्तेसाठी 34 मतांची आवश्यकता होती.
वास्तविकत: राष्ट्रवादीचे 23, काँग्रेसचे 7, शिवसेनेचे 5 सदस्य जिल्हापरिषदेत होते. असे असताना महाराष्ट्र विकास आघाडीला बहुमताचा आकडा गाठणं सहज शक्य होतं. मात्र मोहिते पाटील, समाधान अवताडे गटाने भाजप पुरस्कृत आघाडीला साथ दिल्याने जिल्हापरिषदेवर भाजप पुरस्कृत आघाडीचा झेंडा फडकला. दरम्यान अध्यक्षपदाची निवडणुक सुरु होण्यापुर्वी जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यांनी व्हीप बजावण्याची परवानगी मागितली. मात्र पिठासीन अधिकाऱ्यांनी ही परवानगी नाकरली.
मात्र तरीही पक्ष आदेशाची प्रत त्यांनी संबंधित सदस्यांना दिली. या निवडणुकीत पैशांचा घोडेबाजार झाला असून भाजपने लाखो रुपये देऊन मतं खरेदी केल्याचा आरोप उमेश पाटील यांनी केला. तर पक्ष आदेश झुगारत भाजप पुरस्कृत आघाडीला मतदान करणाऱ्या 6 सदस्यांवर कारवाईची शिफारस करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान लोकांनी भाजपवर विश्वास दाखवला आणि त्यामुळे हा विजय झाल्याची प्रतिक्रिया भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली. निकालाची घोषणा होताच सभागृहाच्या बाहेर जल्लोष करण्यात आला. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार राजेंद्र राऊत, आमदार प्रशांत परिचारक, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील इत्यादी नेत्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा उमेदवार विजयी
दरम्यान या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीचे उमेदवार असलेले अनिरुद्ध कांबळे हे शिवसेनेचे सदस्य आहेत. करमाळा तालुक्यातील केम जिल्हापरिषद गटातून शिवसेनेच्या चिन्हावर अनिरुद्ध कांबळे निवडून आले आहेत. माजी आमदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी नुकतंच एका कार्यक्रमात 'मी अजून राष्ट्रवादीतच आहे' असे विधान केले होते. त्यामुळे सोलापुरात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र भाजपने केलेल्या डावपेचासमोर महाशिवाआघाडीला सोलापूर जिल्हा परिषदेत यश गाठता आलं नाही. मोहिते पाटील गटातील सदस्यानी देखील भाजप पुरस्कृत आघाडीलाच मतदान केल्याने शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला असला तरी खरा किंगमेकर भाजप झाला आहे.
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुक
अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले यांनी बाजी मारली आहे. तर भाजपकडून अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन दाखल केलेल्या सुनीता खेडेकर यांनी आधीच माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीपुढचं भाजपचं आव्हान संपुष्टात आलं. तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement