भाजप मिटकरींच्या 'त्या' वक्तव्याविरोधात भाजपची राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव
भिवंडीतल्या भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्या नीता वैभव भोईर यांनी राष्ट्रीय महिला आयोगात मिटकरींच्या विरोधात ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या सभेत कन्यादानाबद्दल जे वक्तव्य केलं होतं, त्याविरोधात आता भाजपने राष्ट्रीय महिला आयोगात धाव घेतली आहे. भिवंडीतल्या भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्या नीता वैभव भोईर यांनी राष्ट्रीय महिला आयोगात मिटकरींच्या विरोधात ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे.
अमोल मिटकरींनी केलेलं वक्तव्य हे समस्त महिला वर्गाचा अपमान करणारं आणि हिंदू धर्माची खिल्ली उडवणारं आहे. तेव्हा, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी नीता भोईर यांनी केली आहे. याशिवाय मिटकरी भाषण करत असताना पाठीमागे बसलेले मंत्री जयंत पाटील आणि धनंजय मुंडे हे हसून त्यांच्या वक्तव्याला दुजोरा देत होते. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अमोल मिटकरींचं वक्तव्य हिंदूंच्या आणि महिला वर्गाच्या भावना दुखावणार असून त्यांच्या IPC च्या कलम 354 आणि कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी नीता भोईर यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात मिटकरी, धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांच्या अडचणी वाढू शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप ब्राम्हण महासंघाकडून करण्यात येतोय. अमोल मिटकरींनी विविध मंत्रोच्चार जसे की हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारून खिल्ली उडवली, त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना हास्य आवरले नाही.
मिटकरींच्या या वक्तव्यानंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. आता त्यांच्या विरोधात भाजपने राष्ट्रीय महिला आयोगात धाव घेतली आहे.
संबंधित बातम्या:
- अमोल मिटकरींच्या वक्तव्यानंतर पुण्यात मोठा गोंधळ; ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट
- 'कन्यादान'वरुन आमनेसामने! मला माफी मागण्यास सांगणाऱ्यांनी आधी...; मिटकरींचं स्पष्टीकरण