(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला असेल ; सुधीर मुनगंटीवारांची टीका
खासदार संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला असेल, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
Ahmednagar News Update : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांचाच शिवसेनेवर काही तरी राग आहे असे वाटते. त्यामुळे त्यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला असेल,अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
शिर्डीत आयोजीत करण्यात आलेल्या आर्य आणि वैश्य समाजाच्या पहिल्या अधिवेशनाला सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यकर्मानंतर प्रसार माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. यावेळी संजय राऊत यांच्यावरही सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला.
"महात्मा गांधी म्हणाले होते की, काँग्रेस विसर्जित करा, परंतु, काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला नव्हता. राहुल गांधींनी मात्र तो संकल्प केला आहे. सध्या देशातील 20 राज्यात काँग्रेस नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ज्या दिवशी आम्ही काँग्रेससोबत जावू त्या दिवशी शिवसनेचं दुकान मी बंद करेन. ते स्वप्न संजय राऊंत यांना पूर्ण करायचे असेल. साईचरणी एवढीच प्रार्थना करेन की राऊत यांचे ते स्वप्न पूर्ण होईल, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.
मुनगंटीवार म्हणाले, "राज्यात सध्या सुडनाट्य आणि गुंडाराज सुरू आहे. संविधानाचा सन्मान टिकवण्याऐवजी संविधान आणि लोकशाहीला गालबोट लागेल अशी कृती होत आहे. मात्र, जो वाईट कृती करतो त्याला संविधानाच्या शक्तीच्या आधारावर सर्व भोगावं लागत आहे. राज्यात भाजपच्या अनेक नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. बेईमानाच्या आधारावर जन्माला आलेल सरकार आपल्या बेईमानीचा पिच्छा सोडायला तयार नाही. त्यावेळी छगन भुजबळांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली आणि भुजबळांना व्याजासकट अडीच वर्ष जेलमध्ये जावं लागलं."
"वंदे मातरम, भारत माता तसेच पंतप्रधानांसंदर्भात अपशब्द वापरणे हा राजद्रोह नाही. मात्र, हनुमान चालिसाचे पठण करणे हा राजद्रोह ठरत आहे. परिवारात पात्रता नसताना मोठ्या पदावर जाता येतं.ज्यांना वाईट कृती करायची त्यांनी करावी. न्यायपालिकेवर आम्हाला विश्वास असून अपिलात राणा दाम्पत्याचा विजय नक्की होईल असं सुधीर मुंनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
मुनगंटीवार म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे की, कधीही बँक डोअर एंट्री करू नका. नरेंद्र मोदी देखील राज्यसभेतून येऊ शकले असते. मात्र, ते जनतेतून निवडून आले. बँक डोअर एंट्री करणाऱ्यांना फक्त षडयंत्री राजकारण समजतं. जनतेतून निवडून न आल्याने जनतेच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न काय ? लोकहीत काय यापेक्षा फक्त स्वार्थाचा बाजार कसा करायचा हे त्यांना समजतं. भारतीय जनता पार्टी राष्ट्रपती राजवट लावेल असं त्यांना वाटत असेल. मात्रं भाजप दुसऱ्या मार्गाने राष्ट्रपती राजवट लावणार नाही."