पावसाळ्यात दुग्ध व्यवसाय करताना आव्हाने, CEO भुपेंद्र सुरींनी सांगितला उपाय, शेतकऱ्यांनो करुन पाहा
आपल्या देशात ग्रामीण भागातील दुग्धव्यवसायाला पावसाळ्यात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो.
मुंबई : भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आजही ग्रामीण भागावर अवलंबून आहे, कारण देशातील 70 टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात, असे म्हटले जाते. शेती उत्पादनानंतरच इतर प्रक्रिया उद्योग सुरू होतात. तर, शेतीला जोडधंदा असलेल्या दूध उत्पादनाचाही मोठा व्यवसाय देशात आहे. देशातील मोठ-मोठ्या दूध उत्पादक कंपन्या, ग्रामीण भागात उभारण्यात आलेले दूध संघ यांच्या उत्पन्नाचं मूळ हे दूध उत्पादक शेतकरी हेच आहेत. मात्र, या शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना पावसाळ्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यावर, उपाय म्हणून गोदरेज जर्सीचे सीईओ भूपेंद्र सुरी यांनी प्रतिबंधात्मक उपाय सूचवले आहेत. त्याचे अवलंबन केल्यास नक्कीच दूध उत्पादकांना फायदा होऊ शकतो.
आपल्या देशात ग्रामीण भागातील दुग्धव्यवसायाला पावसाळ्यात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. वाढलेली आर्द्रता आणि पर्यावरणीय बदलांमुळे प्राण्यांचे आरोग्य, उत्पादकता आणि शेतीच्या कामांवर परिणाम होतो. गोदरेज जर्सीचे सीईओ भूपेंद्र सुरी या प्रमुख आव्हानांची कल्पना देतानाच, पावसाळ्याशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी दुग्ध उत्पादकांना काही प्रतिबंधात्मक उपायही सुचवितात.
1. आजारांचा वाढता धोका इतर ऋतुंच्या तुलनेत पावसाळ्यात दुग्धजन्य प्राण्यांना विविध विषाणू, जीवाणू, तसेच अन्य रोगांचा संसर्ग होण्याचा धोका दुप्पट असतो. हवेतील ओलावा वाढल्याने हानिकारक सूक्ष्मजीव वाढण्यास पोषक वातावरण निर्माण होते, यामुळेही अनेक रोगांचा प्रसार होण्याची भीती आहे. खराब ड्रेनेज आणि गळती असलेल्या शेडमुळे दुग्धशाळेत पाणी साचते. यामुळे सर्वत्र अस्वच्छ वातावरण निर्माण होते. परिणामी, हवामानाशी संबंधित पाय आणि तोंडाचे रोग, रक्तस्राव सेप्टिसीमिया आणि अँथ्रॅक्ससारख्या रोगांसह जलजन्य रोगांचा धोका वाढतो.
2. कमी उत्पादकता अतिवृष्टीमुळे दुग्धशाळेची उत्पादकता 10-15% कमी होते. उत्पादकतेतील घट साधारणपणे प्रति जनावर प्रतिदिन 1-3 लीटरने कमी होते. अस्वच्छ परिस्थितीमुळे जीवजंतूंची संख्या वाढते, ज्यामुळे स्तनदाह होतो. त्याचा दुधावर परिणाम होतो आणि डेअरी उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान होते. राष्ट्रीय स्तरावर यामुळे वार्षिक 12,000 कोटी रुपयांचे नुकसान होते.
3. खाद्यासंबंधित समस्या पावसाळ्यातील जास्त ओलाव्यामुळे जनावरांच्या खाण्याला बुरशी लागू शकते. असे खाणे खाल्ल्यास ते गुरांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पावसाळ्यातील हिरव्यागार चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. केवळ हाच चारा खाल्ल्याने काही वेळा गुरांचे शेणखत पाणचट होऊ शकते. खाद्याचे सेवन आणि चरण्याचे क्षेत्र कमी झाल्याने पशुधनाच्या समस्यांमध्ये वाढ होते.
4. दुग्ध उत्पादकांसाठी पावसाळी प्रतिबंधात्मक उपाय स्वच्छ दूध उत्पादन पद्धती गोठ्याची नियमितपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करा. कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने शेणखत तयार करा. स्वच्छतेची खात्री करण्यासाठी दूध काढण्याच्या शास्त्रोक्त पद्धती लागू करा आणि त्यांचे पालन करा. एक्टोपॅरासाइट्स नियंत्रित करण्यासाठी फॉगिंग आणि निर्जंतुकीकरण वापरा, जे संसर्गजन्य घटक पसरवू शकतात. परजीवी नियंत्रण पावसाळ्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर सर्वसमावेशक जंतनाशक कार्यक्रम राबवा. यकृत फ्ल्यूक, फुप्फुसातील जंत, टेपवर्म आणि राउंडवर्म यांसारख्या सामान्य प्रादुर्भावांचा निपटारा करा. योग्य आणि वेळच्या वेळी जंतनाशक फवारणीसाठी पशुवैद्यांचा सल्ला घ्या.
पोषण व्यवस्थापन
• कमी झालेल्या चराईची भरपाई करण्यासाठी गुरांच्या आहारात अतिरिक्त पोषक तत्त्वांचा समावेश करा.
• प्राण्यांच्या आरोग्यासाठी आणि उत्पादकतेसाठी महत्त्वपूर्ण संतुलित आहाराची खात्री करा.
• पाणी दूषित होऊ नये, यासाठी स्वच्छ आणि ताज्या पिण्याच्या पाण्याचा सातत्याने पुरवठा करा.
• दूषित चारा टाळण्यासाठी अतिवृष्टीच्या दरम्यान आणि पाणी साचलेल्या भागात चराई मर्यादित करा.
• शुद्ध पाण्याची सतत उपलब्धता निश्चित करून पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले जाईल, यावर लक्ष द्या.
लसीकरण
• पावसाळ्यापूर्वी जनावरांचे संसर्गजन्य रोगांसाठी लसीकरण करा.
• हेमोरेजिक सेप्टिसीमिया (HS), तसेच पाय आणि तोंड (FMD) यांसारख्या प्रमुख रोगांवर लक्ष केंद्रित करा.
• लसीकरणाच्या नोंदी ठेवा आणि शिफारस केल्यानुसार बूस्टर वेळापत्रकांचे पालन करा.
गोठा व्यवस्थापन
• जनावरांच्या शेडमध्ये काटेकोर स्वच्छता ठेवा.
• उरलेले खाद्य, शेण आणि मूत्र नियमितपणे काढून टाका.
• पाणी साचू नये, म्हणून योग्य निचरा होण्याची खात्री करा.
• शेड कोरडे आणि हवेशीर ठेवण्यासाठी उपाययोजना करा.
रोगप्रतिबंधक
• पावसाळ्याशी संबंधित सामान्य रोग, विशेषत: स्तनदाहसारख्या लक्षणांसाठी सतर्क रहा.
• जिवाणू संसर्गाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय लागू करा.
• पावसाळ्यात नियमित आरोग्य तपासणी गरजेची आहे.
• गुरांच्या मूलभूत आरोग्याबाबत जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.
आहार देण्याच्या पद्धती
• खराब होऊ नये, तसेच ओल लागू नये, म्हणून कोरड्या, उंच भागात खाद्य साठवा.
• अतिवृष्टीच्या काळात ताज्या चाऱ्याचा पर्याय म्हणून सायलेज किंवा गवत वापरण्याचा विचार करा.
• फीडच्या गुणवत्तेचे नियमितपणे निरीक्षण करा आणि बुरशीचे किंवा कोणतेही दूषित फीड टाकून द्या.
दरम्यान, प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करून या आव्हानांना तोंड दिल्यास दुग्ध उत्पादक शेतकरी पावसाळ्याशी संबंधित जोखमीचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतात. यासोबतच त्यांच्या पशुधनाचे आरोग्य आणि उत्पादकता सुनिश्चित करू शकतात, तसेच शाश्वत दुग्ध व्यवसाय पद्धतीचेही जतन करू शकतात.