Bharat Jodo : आज 'भारत जोडो'चा महाराष्ट्रातील शेवटचा दिवस, असे असतील कार्यक्रम
काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' आज नांदेड जिल्ह्यात प्रवेश करत 14 दिवसांपूर्वी महाराष्ट्रात धडकली. आज 20 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस असणार आहे.
Bharat Jodo Yatra : काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' आज नांदेड जिल्ह्यात प्रवेश करत 14 दिवसांपूर्वी महाराष्ट्रात धडकली. आज 20 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस असणार आहे. या दिवशीही जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघातही यात्रा असणार आहे. त्यानंतर जळगाव जामोदमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. काल रात्रीचा मुक्काम या यात्रेनं भेंडवळ या गावी केला. त्याआधी राहुल गांधी यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण केली.
उद्याचा कार्यक्रम असा असेल
06:00 भेंडवळ येथून पदयात्रा पुन्हा सुरू.
10:00 सकाळी सातपुडा एज्युकेशन सोसायटी परिसर, जळगाव जामोद, जि. बुलढाणा
16:00 पदयात्रा संविधान चौक, जळगाव जामोद, जि. बुलढाणा
19:00 निमखेडी पोलीस चौकीजवळ, जळगाव जामोद, जि. बुलढाणा
सकाळी 10.30 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आणि भारत जोडो यात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात आज सकाळी 10.30 वा. जळगाव (जामोद) येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.
शनिवारी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा
राहुल गांधी यांनी शनिवारी शहीद शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण केली. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकरी चारीबाजूंनी नाडवला जात आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना व शेतीला उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे मोदी सरकारने आणले होते. या जुलमी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांनी आवाज बुलंद करत दिल्लीला घेराव घालून ऐतिहासिक आंदोलन केले. मोदी सरकारला अखेर शेतकऱ्यांच्या आवाजासमोर झुकावे लागले व तीन काळे कायदे रद्द करावे लागले, या घटनेला आज एक वर्ष झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर 733 बळी टाळता आले असते असे खासदार राहुल गांधी यांनी म्हटले.
राहुल गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांचा आवाज हा देशाचा आवाज आहे. तीन काळे कृषी कायदे अन्यायकारक होते म्हणूनच देशातील शेतकऱ्यांनी त्याला विरोध करत तीव्र आंदोलन केले. दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकला पण मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. काही मोजक्या उद्योगपतींच्या हितासाठी मोदींनी काळे कृषी कायदे आणले होते. सरकारकडे पोलीस, शस्त्रे, प्रशासन सर्व काही होते पण शेतकऱ्यांकडे फक्त त्यांचा आवाज होता. सरकारच्या हटवादीपणामुळे 733 शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला, हे बळी टाळता आले असते, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
ही बातमी देखील वाचा-