(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता नाकाद्वारे लस? Bharat Biotechच्या नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीची चाचणी सुरु!
Bharat Biotech : भारत बायोटेकच्या नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीची चाचणी सुरु झाल्याची माहिती आहे. नागपूर सह देशातील चार ठिकाणी ही चाचणी गोपनीय पद्धतीने सुरु करण्यात आली आहे.
नागपूर : भारत बायोटेकच्या(Bharat Biotech) नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीची चाचणी सुरु झाल्याची माहिती आहे. नागपूर सह देशातील चार ठिकाणी ही चाचणी गोपनीय पद्धतीने सुरु करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भारत बायोटेकने ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडे या लसीच्या चाचणीची परवानगी मागितली होती. ती मिळाल्यानंतर ही चाचणी नागपूर आणि इतर तीन अशा एकूण चार शहरांमध्ये केली जात असल्याची माहिती आहे.
नागपुरात भारत बायोटेकच्या इंजेक्शन द्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची चाचणी या आधी ज्या रुग्णालयांमध्ये झाली होती, त्या रुग्णालयातील डॉक्टर्सनी या चाचणी संदर्भात बोलण्यास नकार दिले आहे. या संदर्भात भारत बायोटेकचे प्रवक्ते हैद्राबाद मधून भाष्य करतील असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान ही चाचणी 18 ते 55 वयोगटातील लोकांमध्ये केली जात असल्याची माहिती आहे. भारतात नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीची मानवी चाचणी पहिल्यांदाच केली जात असून त्यामुळेच चाचणी प्रक्रियेबद्दल कमालीची गोपनीयता पाळली जात आहे.
नाकाद्वारे लस दिल्याने ती थेट फुफुसांपर्यंत पोहोचते त्यामुळे ती जास्त आणि लवकर परिणाम करते असा समज आहे. खास बाब म्हणजे नाकावाटे लस देण्याच्या आधी स्वयंसेवकांची सखोल आरोग्य चाचणी केली जात आहे. नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीच्या चाचणी प्रक्रियेत सहभागी होणारे स्वंयसेवक पूर्णपणे स्वस्थ असावे यासाठी लस देण्याआधी स्वयंसेवकांच्या कोरोना आणि एन्टीबॉडी चाचणीशिवाय इतर अनेक चाचण्याही केल्या जात आहे.