Bhandara Hospital Fire : भंडाऱ्यात 10 चिमुकल्यांचा जीव घेणाऱ्या आग प्रकरणात अखेर गुन्हा दाखल
शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबिलढके असं या दोघींची नावं आहेत. या दोघींवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
भंडारा : भंडाऱ्यात 10 चिमुकल्यांचा जीव घेणाऱ्या आग प्रकरणात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी दोन नर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबिलढके असं या दोघींची नावं आहेत. या दोघींवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आलाय. भंडारा जिल्हा रुग्णालयात 9 जानेवारी रोजी मध्यरात्री लागलेल्या आगीत एकूण दहा चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला होता.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 9 जानेवारीला मध्यरात्री नवजात मुलांच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत 10 नवजात बाकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी रुग्णालयातील दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भंडारा जिल्हा भाजपतर्फे 15 जानेवारीपासून भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु आहे.
काल (21 जानेवारी) आलेल्या अहवालात रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक आणि डॉक्टरांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली तर निवासी वैदकीय अधिकारी यांची बदली करण्यात आली. तर कंत्राटी तत्वावर सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि नर्सवर सेवामुक्तीची कार्यवाही करण्यात आली आहे. या कार्यवाहीने मृत कुटुंबियाना न्याय मिळणार नाही. तर दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे आणि मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे.
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका, कुणावर काय कारवाई
डॉ प्रमोद खंडाते, सिव्हिल सर्जन - निलंबित डॉ. सुनीता बडे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन - बदली अर्चना मेश्राम, वैद्यकीय अधिकारी - निलंबित सुशील अंबडे, बालरोग तज्ञ - सेवा समाप्त ज्योती भारस्कार, नर्स इनचार्ज - निलंबित स्मिता आंबीलडुके, स्टाफ नर्स - सेवा समाप्त शुभांगी साठवणे, स्टाफ नर्स - सेवा समाप्त
संबंधित बातम्या :