Bhandara Gondia Lok Sabha : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 25 वर्षानंतर काँग्रेसचा चेहरा; भाजपने मात्र कायम ठेवला आपला मोहरा
भंडार गोंदिया मतदारसंघात तब्बल 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच काँग्रेसचा पंजा या चिन्हावर उमेदवार उभा होत असून काँग्रेसने या मतदारसंघात फेस चेंजची खेळी खेळली आहे. तर भाजपने आपला जूनाच चेहरा कायम ठेवला आहे.
Bhandara Gondia Loksabha: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) 111 उमेदवारांची पाचवी यादी रविवारी रात्री जाहीर केलीय. यात सोलापूर मधून राम सातपुते, गडचिरोली-चिमुर मधून अशोक नेते, तर भंडार गोंदिया मतदारसंघातून सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेसच्या (Congress) डॉ प्रशांत पडोळे (Prashant Padole) विरुद्ध भाजपच्या सुनील मेंढे यांच्यात सामना रंगणार आहे.
विशेष बाब म्हणजे या मतदारसंघात तब्बल 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच काँग्रेसचा पंजा या चिन्हावर उमेदवार उभा होत असून काँग्रेसने या मतदारसंघात फेस चेंजची खेळी खेळली आहे. तर भाजपने आपला जूनाच चेहरा कायम ठेवत सध्याचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्यावर विश्वास दाखवीत त्यांची उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात 25 वर्षानंतर काँग्रेसचा चेहरा
मागील अनेक दिवसांपासून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील जागावाटपचा तिढा कायम असतांना अनेक चर्चांना उत आला होता. अशातच सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर सुनील मेंढे यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केल्याने या चर्चा आणि तर्कवितर्कांना आता पूर्णविराम लागला आहे. उमेदवारी घोषित होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण आता बघायला मिळत आहे. सलग दुसऱ्यांदा भाजपने सुनील मेंढे यांना उमेदवारी दिल्यानं मेंढे यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
सलग दुसऱ्यांदा सुनील मेंढेंना संधी
मी माझ्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. त्यामुळे पक्षश्रेष्ठीनं माझ्यावर दाखवलेला हा विश्वास आहे. सलग दुसऱ्यांदा मला उमेदवारी दिल्यानं तो विश्वास आता पुन्हा एकदा सार्थकी लावण्यासाठी मी, माझे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया सुनील मेंढे यांनी बोलताना व्यक्त केलीय. दुसऱ्यांदा मलाच उमेदवारी मिळणार याचा निश्चितच मला विश्वास होता. मी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची मला ही पावती मिळाली आहे. त्यामुळे आता मला आगामी निवडणुकीमध्ये साडेतीन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवयचा असून मला पूर्ण विश्वास आहे याकरिता मतदार मला पूर्ण साथ देईल. असा विश्वास देखील सुनील मेंढे यांनी बोलताना व्यक्त केलाय.
काँग्रेसच्या डॉ. प्रशांत पडोळे विरोधात रंगणार सामना
भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाने भंडारा येथील प्रसिद्ध डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. प्रशांत पडोळे हे गोंदिया जिल्ह्याचे सहकार महर्षी यादवराव पडोळे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांनी युक्रेन इथून वैद्यकीय शिक्षण घेतलं असून कोरोना काळात त्यांनी रुग्णसेवा करीत एक महत्त्वाचं योगदान दिलं. 25 वर्षानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचा पंजा या चिन्हावर उमेदवार उभा होत असल्यानं मतदारांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतं आहे. सोबतच पडोळे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्थरावर मोर्चे बांधणी करत महायुतीचा उमेदवार पाडण्यासाठी मेगाप्लॅन तयार केल्याचे देखील बोलले जात आहे. असे असले तरी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदार नेमके कोणाला साथ देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या