एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ती क्लीप ऐकून धक्का बसला, पंकजांनी सत्तेचा दुरुपयोग करु नये: नामदेवशास्त्री
मुंबई/बीड: भगवानगडाच्या वर्चस्वावरुन पंकजा मुंडे आणि नामदेवशास्त्रींमधला वाद टोकाला गेला आहे. पंकजां मुंडेंनी आपल्याला धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लीप आपण ऐकली असून ती क्लिप पंकजा मुंडेंचे कार्यकर्तेच व्हायरल करीत असल्याचा आरोप नामदेवशास्त्री यांनी केला आहे.
'माझं आजही पंकजावर मुलीप्रमाणे प्रेम आहे. पण धमकीची ती क्लिप ऐकून मला धक्का बसला आहे. पंकजानं सत्तेचा दुरुपयोग करु नये.' असं नामदेवशास्त्री एबीपी माझाशी बोलताना म्हणाले
'संताना मरणाची भीती नसते. त्या ऑडिओ क्लीपबाबत माझा काहीही आरोप नाही. पण त्या क्लीपनं मला धक्का बसला आहे. नेत्यांनी राजकारणासाठी एवढ्या खालच्या पातळीला जाऊ नये.' असंही नामदेवशास्त्री म्हणाले.
'पंकजांनी सत्तेचा दुरुपयोग करु नये. तसंच मान हा मागून मिळत नाही तर तो मिळवावा लागतो.' असा टोमणा त्यांनी पंकजा मुंडेना लगावला आहे.
'गडावर भक्तांचा अधिकार आहे आणि माळकरी हे गडाचे भक्त आहे. दारु पिणारे गडाचे भक्त नाहीत. जसा पक्षावर, नेत्यावर कार्यकर्त्यांचा अधिकार असतो. तसाच गडावर भक्तांचा अधिकार आहे.' असंही नामदेवशास्त्री म्हणाले.
'भगवानगडावर येण्याची सगळ्यांना परवानगी आहे. पण गोपीनाथ गडाची याचवर्षी निर्मिती झाली. स्वत: पंकजांनी जाहीर केलं होतं की, भगवान गड श्रद्धेचा आहे आणि गोपीनाथ गड राजकीय आहे.' असं म्हणत नामदेवशास्त्रींनी त्यांना भगवानगडावर भाषण करण्यास जोरदार विरोध केला आहे.
पंकजा मुंडे कार्यकर्त्यांशी बोलत असतानाच खासगी संभाषण रेकॉर्ड करण्यात आलं. आणि त्यावरुनच आपल्याल धमकी देण्यात आली असं शास्त्रींचं म्हणणं आहे.
दसरा मेळाव्याला पंकजांचं भगवानगडावर भाषण होऊ नये, यासाठी नामदेवशास्त्री आक्रमक झाले आहेत. त्यानंतरही पंकजांनी आपण कुठल्याही स्थितीत गडावर जाणार असं ठणकावलं. त्यानंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमुळं आता प्रकरण चिघळण्याच्या स्थितीत आहे.
दरम्यान, आज पंकजा मुंडेंनी एक सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी, “मी पंकजा गोपीनाथ मुंडे…येत आहे दरवर्षीप्रमाणे आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी, तुमच्यासाठी- आपल्यासाठी, भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी. मग भेटूया दसऱ्याला, तुम्ही येणार ना?” असं म्हटलं आहे.
नामदेव शास्त्रींचा इशारा
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सामान्य भक्ताप्रमाणे भगवान गडावर यावं, मात्र त्यांनी भाषण करु नये, अशी अट महंत नामदेवशास्त्री महाराज यांनी घातली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
भगवान गडावर ये, पण भाषण नको, नामदेवशास्त्रींची पंकजा मुंडेंना अट
पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट
पंकजा मुंडे यांनी भगवान गडाबाबत फेसबुक पोस्ट अपलोड केली. “हो मी येणार दसऱ्याला तुमच्यासाठी, आपल्यासाठी भगवान गडाची कन्या म्हणून भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी… आणि तुम्ही? तुम्ही येणार ना?” असं पंकजा यांनी म्हटलं आहे.
भगवान गडाचा वाद नेमका काय?
भगवान गडावरील दसरा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे हे समीकरण होतं. गोपीनाथ मुंडे यांचं दसरा मेळाव्याला भगवान गडावरुन भाषण होत असे. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर भगवान गडावर राजकीय भाषण होणार नाही, अशी भूमिका भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली. त्याला वंजारी सेवा संघानं विरोध करत आक्रमक भूमिका घेतली. गेल्या वर्षी भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत झाला होता.
मात्र, गेल्या काही दिवसात नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वाद सुरु झाले. त्यानंतर या गडावरुन राजकीय भाषण होणार नाही, अशी भूमिका नामदेवशास्त्रींनी घेतली.
गोपीनाथ गडावरुन भाषण करावं
भगवानगडावरुन राजकीय भाषण करु नये असं सांगत नामदेव शास्त्री म्हणाले, “पंकजा मुंडेंनी गोपीनाथगड उभा केला आहे. त्याठिकाणी त्यांनी राजकीय भाषण करावं”.
वंजारी संघाचा इशारा
भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्येच झाला पाहिजे, नाही तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा वंजारी सेवा संघाच्या वतीनं देण्यात आला होता. तर दुसरीकडे पंकजा मुंडेचे येथे भाषण होणार नाही, अशी भूमिका गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली होती.
संबंधित बातम्या:
भगवान गडावर येणारच, पंकजा मुंडेंचा व्हिडीओ मेसेज
भगवान गडावर ये, पण भाषण नको, नामदेवशास्त्रींची पंकजा मुंडेंना अट
दसऱ्याला भगवान गडावर येणारच: पंकजा मुंडे
महंत नामदेव शास्त्रींवर जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा
भगवानगडावर राडा, नामदेव शास्त्री-पंकजा मुंडे समर्थक भिडले
भगवानगड दसरा मेळावा वादः नामदेव शास्त्रींचं मुख्यमंत्र्यांना पत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement